Eknath Shinde: ठाण्यात श्रीकांत एकनाथ शिंदे भगवा घेऊन रस्त्यावर; महापौर मस्केही म्हणतात, मी शिंदेंसोबत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यावर उतरुन शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे सुद्धा होते. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिंदे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद, अशा घोषणा यावेळी देण्यात आले.
ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहेत. त्यांची कार्यालये फोडण्याचा प्रयत्न होतोय. ठाण्यातही (Thane) एकनाथ शिंदे यांचं कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी रस्त्यावर उतरुन शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे सुद्धा होते. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिंदे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद, अशा घोषणा यावेळी देण्यात आले. नरेश म्हस्के यांनीही आपण शिंदेसाहेब यांच्यासोबत असल्याचं यावेळी जाहीर केलं.
राष्ट्रवादीकडून सामान्य शिवसैनिकाची गळचेपी- श्रीकांत शिंदे
ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर आपण दुसऱ्या पक्षाची गळचेपी कधी केली नाही. पण बाहेर जिल्ह्यात जिथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे तिथे शिवेसनेच्या कार्यकर्त्याची काय स्थिती आहे? ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे साखर कारखाने आहेत, पण आज शिवसेनेच्या कार्यकर्त्या ऊस नेला जात नव्हता, अशी अवस्था तर शिवसैनिकांची होत असेल तर या सत्तेत राहण्यात काय अर्थ? असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय. इतकंच नाही तर शिवसेनेला दाबण्याचं काम या दोन्ही पक्षाकडून झालं, खासकरुन राष्ट्रवादीकडून झालं. नेतृत्वाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, पण ऐकलं गेलं नाही, म्हणून आपल्यावर ही वेळ आल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.
‘आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात लढलो, पुढेही लढत राहू’
आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. ठाणे महानगरपालिकेचा काम करत असताना अनेक त्रास झाला. अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. अनेक आरोप करण्यात आले. आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असतानाही ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खूप त्रास दिला. ज्यावेळी ऑक्सिजनचा प्रश्न होता, तेव्हा ठाणे महापालिकेत ऑक्सिजन आपण निर्माण केला. परंतू महापालिकेला बदनाम करण्यासाठी महासभे दिवशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं. कशासाठी? महाविकास आघाडीत असताना तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे तिथे तुम्ही आमच्याविरोधात आंदोलन करत होता. मग कसली आलीय आघाडी? मग आम्ही ठरवलं आयुष्यभर आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात लढलो, पुढेही आम्ही त्यांच्याविरोधात लढत राहू.
आमच्या नादी लागाल तर भारी पडेल – नरेश म्हस्के
आताही आमदार सांगत आहेत की आम्ही शिवसेनेतच आहोत, फक्त राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी तोडा. म्हणून ठाण्यातील शिवसैनिक शिंदेसाहेबांच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत राहणात. ठाण्यात कुणाची माय व्यायली नाही. पण काही बातम्या आल्या की शिंदे साहेबांच्या बॅनरला काळं फासण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मला सांगायचं आहे की आमच्या नादी लागाल तर भारी पडेल. आतापर्यंत आम्ही संयम राखलाय. आज ठाण्यात कुठल्याही पद्धतीत कुणाच्याही विरोधात कुठलंही वक्तव्य केलं नाही. आम्ही दिघे साहेबांच्या संस्कृतीत वाढलो आहोत. आजही आम्ही शिवसेनेत आहोत.