Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं आपल्याच नेतृत्वाविरोधात बंड का?; बंडामागची 5 कारणे कोणती?
Eknath Shinde : सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आणि खासदार त्रस्त झाले आहेत.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेतृत्वाविरोधात बंड केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेसाठी (shivsena) हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात आहे. राज्यसभा आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी स्वत: सक्रिय असलेल्या शिंदे यांनी अचानक बंड पुकारल्याने आघाडीचे धाबे दणाणले आहेत. शिंदे यांनी थेट सुरत गाठलं आहे. शिंदे मुख्यमंत्र्यांच्याच कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच राष्ट्रवादीवरील नाराजी आणि निधी मिळण्यात होत असलेला अन्याय यामुळे शिंदे यांनी थेट आघाडीलाच आव्हान दिल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपसोबत युती होण्याचा आग्रह
शिवसेना आणि भाजपची आघाडी व्हावी असं एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीपासूनचं मत होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि भाजपची युती ही स्वाभाविक युती आहे, असं त्यांचं मत होतं. मात्र, एका मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे शिंदे यांच्यासह अनेकजण नाराज होते. त्यामुळेच त्यांनी बंड पुकारल्याचं सांगितलं जातंय.
राष्ट्रवादीवर नाराजी
एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने शिवसेनेवर दबाव आणला जात आहे. शिवाय राज्यात शिवसेनेची सत्ता असण्यापेक्षा राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचं चित्रं आहे. युतीच्या काळात मुख्यमंत्री भाजपचा असला तरी सत्तेचं केंद्र मातोश्री असायचं. आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही सत्तेचं केंद्र सिल्व्हर ओक झालं आहे. दोन पवारांच्यापुढे आघाडी सरकार जात नसल्याने शिंदे नाराज होते. शिंदे यांच्या बंडामागचं हे सुद्धा एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
निधी वाटपात अन्याय
राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद आहे. तसेच अर्थ खातंही आहे. त्यामुळे आमदारांना किती निधी द्यायचा हे राष्ट्रवादीच्या हाती आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून सातत्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला. राष्ट्रवादीच्या आमदारांना मात्र भरघोस निधी मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराने गेल्या अडीच वर्षात निधी मिळण्यावरून कधीच तक्रार केली नाही. उलट काँग्रेसने निधी बाबत सर्वात आधी तक्रार केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनीही या तक्रारी केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती. याबाबत आमदारांकडून सातत्याने शिंदे यांना विचारणाही केली जात होती.
निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मदत नाही
आघाडी झाल्यानंतर एकत्रित निवडणुका लढवल्यास आघाडी धर्म पाळण्याचं ठरलं होतं. पण आघाडी झाल्यानंतर ग्रामपंचायतीपासून ते राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. पण प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दगाफटका झाला. मुख्यमंत्रीपद असूनही राज्यात शिवसेनेला गावपातळीवरील निवडणुकांमध्येही करिश्मा घडवून आणता आला नाही. शिवसेनेची सातत्याने पिछेहाट झाली. राज्यसभा निवडणुकीतही संख्याबळ पुरेसं असूनही शिवसेनेचा उमेदवार पडला. आघाडीतील मित्र पक्षांनी मदत न केल्यानेच हा पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेही शिंदे नाराज होते.
ईडी, सीबीआयच्या कारवाईने नेते त्रस्त
सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आणि खासदार त्रस्त झाले आहेत. या कारवाया थांबण्यासाठी भाजपशी युती करण्याची मागणी अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली होती. प्रताप सरनाईक यांनी तर मुख्यमंत्र्यांनी थेट पत्रं लिहून ही मागणी केली होती. मात्र, त्याकडेही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं. अनेक आमदारांना आपल्या घरापर्यंत कधीही ईडी येऊ शकते अशी सातत्याने भीती होती. ही भीती संबंधित आमदार एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवत होते. त्यामुळेही शिंदे यांनी बंडाचं मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.