दिवाळीपूर्वी महाराष्ट्र निवडणुका घेण्याचा विचार : निवडणूक आयोग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या (Poll dates for Maharashtra) अनुषंगाने माहिती आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग मुंबई दौऱ्यावर (EC meeting in mumbai ) आले आहे.
मुंबई :देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज बैठक घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदरच घ्याव्या म्हणून राजकीय पक्षांची मागणी आहे, याबद्दल निवडणूक आयोग विचार करत आहे, असं सुनील अरोरा यांनी सांगितलं.
“राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत बैठका घेतल्या. राजकीय पक्षांनी मागणी केली आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावर मतदान केंद्र घ्यावं, या संदर्भात निवडणूक आयोग सकारात्मक विचार करत आहे”, असं अरोरा म्हणाले.
निवडणुकी वेळी कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचं ते म्हणाले.
निवडणूक आयोगाची बैठक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या (Poll dates for Maharashtra) अनुषंगाने माहिती आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग मुंबई दौऱ्यावर (EC meeting in mumbai ) आले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आढावा (Poll dates for Maharashtra) बैठक झाली.
सह्याद्री राज्य अतिथीगृह इथे राजकीय पक्षांसमवेत बैठकीत काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांनी मागणी केली आहे की निवडणुकीची तारीख दिवाळीपूर्वी निश्चित करावी, EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी. पण निवडणूक आयोगाने ईव्हीएमनेच निवडणुका घेण्याचं निश्चित केल्याचं काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सांगितलं. तसेच ईव्हीएमसोबत VVPAT असल्याने निवडणुका सक्षम होईल असं आश्वासन निवडणूक आयोगाने दिल्याचं शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 28 लाख आहे ती 70 लाखांपर्यंत करावी अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने केली आहे.
तर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बोगस मतदारांसंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे सचिव राजेश शर्मा यांनी निवडणूक आयोगाला 44 लाख 61हजार बोगस मतदार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे 25 फेब्रुवारीला केली होती. निवडणूक आयोगाने 2 लाख 16 हजार बोगस मतदारांची यादी डिलीट केल्याचं काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले.
विधानसभा निवडणुकीची दिल्लीत घोषणा
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राजकीय पक्षांसमवेत बैठकींनंतर दुपारी २.३० वाजता विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत बैठक होईल. दुपारी ४.४५ वाजता निवडणूक खर्च देखरेखविषयक विभागांसोबत बैठक होईल. सायंकाळी ५.१५ वाजता राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि राज्य शासनाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे होणा-या पत्रकार परिषदेत विविध आढाव्याची माहिती देण्यात येईल.
दौऱ्यामध्ये वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा आणि संदीप सक्सेना, उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन आणि चंद्रभूषण कुमार, महासंचालक धिरेंद्र ओझा, संचालक (वित्त) विक्रम बात्रा, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक शेफाली शरण, सचिव ए. एन. दास आणि अवर सचिव आय. सी. गोयल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यानंतर दिल्ली येथे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा केली जाणार आहे.