ED Raid : आधी अनिल परबांना नोटीस, आता ईडीकडून भावना गवळींच्या 5 ठिकाणांवर धाडी
who is Bhavana Gawali : ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.
यवतमाळ/ वाशिम : शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawli) यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.
ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.
किरीट सोमय्यांचा आरोप
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक
दरम्यान दहा दिवसापूर्वी किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर होते. त्यावेळ सोमय्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता जात होते. त्यावेळी भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्य्या यांच्यासोबत भाजप आमदार राजेंद्र पाटणी होते.
नेमकं प्रकरण काय?
श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
कोण आहेत भावना गवळी?
विदर्भातील शिवसेनेच्या ताकदवान नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचा समावेश होतो. 2019 मध्ये सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून भावना गवळी (Bhavna Gawli) यांनी आपला राजकीय दबदबा सिद्ध केला होता. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील राजकारणात समर्थपणे पाय रोवून उभ्या आहेत.
भावना गवळी यांचा राजकीय प्रवास
लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवून उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या 20 ते 22 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
संबंधित बातम्या
विदर्भातील शिवसेनेच्या सामर्थ्यवान नेत्या, वन वुमेन आर्मी, जाणून घ्या कोण आहेत भावना गवळी?
BREAKING – किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक
भावना गवळी कारखाना घोटाळा प्रकरणी पोलिसांना झटका, न्यायालयाकडून कारवाईचं शपथपत्र देण्याचे आदेश