मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही रोखठोक निर्णय, नवी मुंबईतील प्रकल्प गुंडाळला
पर्यावरणाप्रती जागरुकता असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईतील गोल्फ कोर्स संकल्पना (Nerul golf course project scrap) गुंडाळली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणाप्रती जागरुकता असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईतील गोल्फ कोर्स संकल्पना (Nerul golf course project scrap) गुंडाळली. सी वूड सेक्टर 60 येथील NRI कॉम्प्लेक्सच्या मागे निवासी संकुलासह गोल्फ कोर्स ही संकल्पना (Nerul golf course project scrap) सुमारे 35 हेक्टर जागेवर आकार घेत होती. सिडकोच्या माध्यमातून 2004 मध्ये मेस्त्री बिल्डरला ही जागा देण्यात आली. खाडीकिनारी ही जागा होती.
या प्रकल्पासाठी 2017 पासून मोठ्या प्रमाणात झाडे आणि कांदळवनांची कत्तल होत होती. तसेच भराव टाकण्याचे काम सुरु होते. या भरावाच्या कामामुळे फ्लेमिंगो पक्षी न येण्याची भीती व्यक्त होत होती.
नवी मुंबईतील पर्यावरण जागरुक नागरिकांनी या संकल्पनेला विरोध केला होता. त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच नुकतीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणली होती.
त्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सिडको अधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली. या बैठकीत या संकल्पनेचा आढावा घेण्यात आला.
नवी मुंबईत खारघरमध्ये एक गोल्फ कोर्स असून तो वापराविना पडून आहे. त्यात नवी मुंबईत आणखी गोल्फ कोर्सची भर कशाला? तसेच नव्या गोल्फ कोर्ससाठी कांदळवनांची कत्तल का केली जावी? गोल्फ कोर्ससाठी खाजगी विकासकाचे उखळ पांढरे का करण्यात यावे? असे अनेक मुद्दे बैठकीतील चर्चेत पुढे आले.