शरद पवारांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने हटवली
शरद पवारांची सुरक्षा काढण्यामागील कुठलंही कारण कळवलं नाही, अशी माहिती शरद पवार यांच्या दिल्ली कार्यालयाने दिली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारकडून सुरक्षेत कपात (Sharad Pawar Home Security Removed) केल्याची माहिती आहे.
शरद पवार यांच्या दिल्ली कार्यालयाशी संपर्क केला असता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा हटवली का, असा प्रश्न विचारला जात आहे. पवारांची सुरक्षा काढण्यामागील कुठलंही कारण कळवलं नाही, अशी माहिती शरद पवार यांच्या दिल्ली कार्यालयाने दिली आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीव्हीआयपी) केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. संभाव्य धोक्याचा आढावा घेऊन त्यात बदलही केला जातो. दिल्लीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांमार्फत सुरक्षा दिली जाते. त्यानुसार शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सहा जनपथ’मध्ये दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान दिवसरात्र तैनात होते.
आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल : शरद पवार
पवारांच्या निवासस्थानाबाहेरील सर्व सुरक्षा व्यवस्था सोमवार 20 जानेवारीपासून हटवण्यात आल्याचं समोर आलं आहे. अशाप्रकारे दिल्लीतील 40 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतही अचानक कपात झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सरकारतर्फे या बदलाविषयीची कोणतीही अधिकृत माहिती किंवा पूर्वकल्पना संबंधित व्यक्तींना देण्यात आलेली नाही.
दिल्लीत सुरु असलेली आंदोलनं, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेमुळे मोदी सरकारने सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उपयोग अन्यत्र केल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु सुरक्षा हटवण्यापूर्वी कल्पना न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता. तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना केंद्र सरकारतर्फे पुरवली जाणारी सुरक्षा व्यवस्थाही हटवण्यात आली आहे.
दुसरीकडे, नागरिकत्व कायद्याविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘कृष्ण मेनन’ मार्गावरील निवासस्थानाच्या परिसरातील वाहतूकच अन्यत्र वळवण्यात आली आहे.
Sharad Pawar Home Security Removed