मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’तील आमिर खानप्रमाणे, माजी कृषिमंत्र्यांचा बोचरा वार
मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, असा सल्लाही अनिल बोंडेंनी दिला.
उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी कृषिमंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’ सिनेमातील विस्मरण होणाऱ्या आमिर खानच्या व्यक्तिरेखेसारखी झाल्याचा घणाघात बोंडेंनी केला. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली. (former Agriculture Minister Anil Bonde compares Uddhav Thackeray with Amir Khan in Ghajini Movie)
उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘गजनी’ सिनेमात विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, असा सल्लाही अनिल बोंडेंनी दिला. ‘गजनी’ सिनेमात आमिर खानसाने साकारलेल्या संजय सिंघानिया या व्यक्तिरेखेला विस्मरणाचा आजार जडला होता.
“मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी कोराडवाहूला 25 हजार आणि बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊ अशी मागणी केली होती, याचा त्यांना विसर पडला. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावे, स्वतः गहाण राहावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.
“सध्या शेतकऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री व सत्ताधारी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप आलेले नाहीत. कारण सगळे जण आपल्या कुटुंबासोबत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी हेच त्यांच्यासाठी मोठं आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबाची त्यांना काळजी नाही. उद्धव ठाकरे यांनी मंत्री व आमदारांना आपल्या कुटुंबासोबत राहावं आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळा असे आदेश दिले आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाहीत, फटके मारतील” अशी टीकाही अनिल बोंडेंनी केली.
“संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि बंगालच्या उपसागरातील पट्ट्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे झाले तरी आम्ही मदत देऊ शकत नाही, असं कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन हातचं गेलं, तुरीमध्ये पाणी आहे, कापसाची पात्या-बोंडं गळून पडली, कांद्याचं अतोनात नुकसान झालं आहे. सरकारने पंचनाम्याच्या भानगडीत पडण्याऐवजी जिथे पावसामुळे नुकसान झालं, तिथे सरसकट नुकसान भरपाई द्यावी. मागच्या वेळी आम्ही जो जीआर काढला, एनडीआरएफ-एसडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई द्यावी” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.
पाहा व्हिडीओ :
PHOTO: हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल, शेतकरी धाय मोकलून रडले https://t.co/jGGXhiqGRr #Farmers #HeavyRains #Rain #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2020
संबंधित बातम्या :
कृत्रिम पावसासाठी रडार सज्ज, फक्त ढगांची प्रतिक्षा: कृषीमंत्री अनिल बोंडे
खडसे ते बोंडे, ‘त्या’ केबिनमध्ये राजकीय कारकीर्दीची अखेर, मंत्रालयात राजकीय अंधश्रद्धा
(former Agriculture Minister Anil Bonde compares Uddhav Thackeray with Amir Khan in Ghajini Movie)