माजी खासदार संजय काकडेंवर गुन्हा, मेव्हण्याला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप
व्यावसायिक स्पर्धेतून खासदार संजय काकडे यांनी मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला जात आहे.
पुणे : भाजपचे सहयोगी, माजी खासदार संजय काकडे आणि पत्नी उषा काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडे दाम्पत्याने उषा यांच्या भावाला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. (Former Rajyasabha MP Sanjay Kakade booked for threatening brother in law in Pune)
व्यावसायिक स्पर्धेतून खासदार संजय काकडे यांनी मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला जात आहे. पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात काल रात्री (रविवार 2 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“माझे अनेक गुंडांशी संबंध आहेत, त्यामुळे नीट रहा” अशा शब्दात संजय काकडे यांनी मेव्हण्याला धमकावल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी काकडे यांचे 40 वर्षीय मेहुणे युवराज ढमाले यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती.
हेही वाचा : पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार, जागावाटपही निश्चित, आमच्यासाठी धोक्याची घंटा : संजय काकडे
संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला बहीण-भावातील वितुष्ट समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोण आहेत संजय काकडे?
संजय काकडे हे भाजपच्या पाठिंब्याने 2014 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. अपक्ष म्हणून ते खासदारपदी निवडून आले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एप्रिल 2020 मध्ये त्यांच्या खासदारकीची मुदत संपली. काकडे हे व्यवसायाने रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. मागील 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं आहे.” असा दावा संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केला होता. (Former Rajyasabha MP Sanjay Kakade booked for threatening brother in law in Pune)