मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यांच्यासोबत 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवार हे आज सकाळपासूनच त्यांच्या बंगल्यावर होते. देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीचे काही आमदारही आले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेही आल्या होत्या. यावेळी या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार बंगल्यातून निघाले. ते थेट राजभवनात पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात आले. अजित पवार यांनी राज्यपालांना 30 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत इतर नऊ आमदारांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
धर्मराव बाबा अत्राम
आदिती तटकरे
संजय बनसोडे
अनिल पाटील
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडाशी आपला काहीच संबंध नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मी खंबीर आहे. लढायला मजबूत आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच जे आमदार गेले आहेत. त्यातील 80 टक्के आमदार संध्याकाळपर्यंत परत येतील, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आमदार जमू लागले आहेत. जयंत पाटील हे इतर आमदारांच्या संपर्कात आहेत. राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांना भेटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.