Ganesh Naik Live In Case: नवी मुंबईतल्या बलात्कार प्रकरणी गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार कायम, 27 तारखेला पुढची सुनावणी
गणेश नाईक यांच्यावरील दाखल गुन्हा प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी तपास अधिकारी यांचा जबाब घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर देणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 27 तारखेला होणार आहे.
ठाणे : भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावरील दाखल गुन्हा प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयात (Thane District Court) पार पडली. यावेळी तपास अधिकारी यांचा जबाब घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर देणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 27 तारखेला होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राजकीय फायद्यासाठी (Political advantage) नाईक यांच्याविरोधात खोटे आरोप आणि खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप गणेश नाईकांचे वकील शिरीष गुप्ते यांच्याकडून करण्यात आलाय. 2 वर्षापूर्वी पक्ष बदलल्यामुळे नाईक यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नाईक यांच्या वकिलांनी केलाय.
दरम्यान, गणेश नाईक यांच्यावर आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांच्या वकिलांनी दिलेले माहितीनुसार, आज 376 ऐकलं गेलं नाही. आपलं दुसरं धमकीचं प्रकरण आहे त्यात अर्ग्युमेंट्स फॉरवर्ड केले गेले आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते राजकीय व्यक्ती आहेत. त्यांनी आता दुसऱ्या पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांच्यावर राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करण्यात येत आहेत. त्यावर मी सांगितलं की ते खूप प्रभावी राजकारणी आहेत, ती काही सामान्य व्यक्ती नाही. 27 वर्षे माझ्या अशिलावर मोठा अन्याय झालाय. माझी तक्रारही कुठे ऐकून घेतली गेली नव्हती. आता लोक पुढे येत आहेत. तर मला किमान आशा आहे की मला न्याय मिळेल. त्यावर न्यायाधिशांनी 27 तारीख दिली आहे. तेव्हाच पुढे काय ते कळेल.
माझ्या जीविताला धोका- दीपा चव्हाण
दरम्यान, गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचं म्हटलंय. नाईकसाहेब यांना जामीन मिळाल्यास माझं अपहरण होऊ शकतं. माझ्याकडून जबरदस्तीने काही लिहून घेतलं जाऊ शकतं. माझ्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे मला लोकांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारकडून मला चांगलं सहकार्य मिळत असल्याचं ही चव्हाण यांनी सांगितलं.
पीडित महिलेचा नेमका आरोप काय?
गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी गंभीर आरोप केलेत. माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. गेली 27 वर्षे मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. गणेश नाईक हे मला नुसते आश्वासन द्यायचे. आमच्या संबंधातून मला एक मुलगाही आहे. नाईकांनी मला आश्वासन दिलं होतं की, मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसं काहीच केलं नाही. नाईकांनी आम्हाला कोणतंच आर्थिक पाठबळ दिलं नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुला झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझं लैंगिक शोषण झालं, असा आरोप दीपा चौहान यांनी केलाय.
तसंच नाईक आणि त्यांच्या परिवारानं मला अनेकवेळा अपमानास्पद वागणूक दिली. अनेकवेळा त्यांच्या मुलाकडून मला धमक्याही देण्यात आल्या. एकदा माझा मुलगा त्यांच्या बालाजी टॉवर या राहत्या घरी गेल्यावर त्याला हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मी स्वत: मुलाला घेऊन गेल्यानंतर आम्हाला हाकलून देत, अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
माझा शारीरिक आणि मानसिक छळ नाईक यांनी केलाय. आता त्यांच्याविरोधात अनेक संघटना, पक्ष पुढे येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होतेय. पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. मला न्याय आणि माझा हक्क मिळाला पाहिजे. मी वकिलामार्फत माझी लढाई लढत आहे, अशी माहितीही चौहान यांनी दिलीय.
इतर बातम्या :