अखेर गणेश नाईकांनाही भाजपकडून उमेदवारी जाहीर
भाजपकडून बेलापूरमध्ये गणेश नाईक इच्छुक होते. पण बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच तिकीट देण्यात आलं.
नवी मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik Airoli) यांना अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी ऐरोली (Ganesh Naik Airoli) मतदारसंघातून माघार घेतली. त्यांच्या जागी गणेश नाईक यांना भाजप प्रभारी सतीश धोंड यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला. भाजपकडून बेलापूरमध्ये गणेश नाईक इच्छुक होते. पण बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच तिकीट देण्यात आलं.
शिवसैनिक आक्रमक
नवी मुंबईत शिवसेनेला जागा न सोडल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली, तर ऐरोलीतून नाईक कुटुंबातच उमेदवारी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. नवी मुंबईतील शिवसेना कार्यालयाबाहेर जमून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
गणेश नाईक यांचं वर्चस्व
गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली आहे.
गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.
भाजपची पहिली यादी जाहीर
भाजपने मंगळवारी 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर आणखी एक यादी जाहीर केली जाणार आहे. कारण, भाजपातील दिग्गज नेते अजूनही वेटिंगवर असल्याने यादीची उत्सुकता ताणली आहे.