Ganesh Naik : गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, अटकेची टांगती तलवार! सूत्रांची माहिती
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाईकांच्या अटकेचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आता नाईक यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकंच नाही तर पोलिसांकडून नाईकांचा शोध सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मुंबई : भाजपमधील मोठं नाव आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दीपा चौहान या महिलेनं गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. त्यानंतर नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलीस (Nerul Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राज्य महिला आयोगाकडेही (State Women Commission) संबंधित महिलेनं तक्रार केलीय. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाईकांच्या अटकेचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आता नाईक यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकंच नाही तर पोलिसांकडून नाईकांचा शोध सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पोलिसांनी गणेश नाईक यांचं घर, कार्यालय आणि मुरबाडमधील फार्म हाऊसवरही शोध घेतल्याची माहिती मिळतेय.
महाविकास आघाडीचं आंदोलन
एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर आणि नेरुळमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीनंतरही नाईक यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळेच आज महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज वाशी पोलीस आयुक्तालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी महिलांनी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आपला संतापही व्यक्त केला. एक दो एक दो गणेश नाईक को फेक दो, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अटक करा, अटक करा, गणेश नाईकांना अटक करा आणि गणेश नाईकांची दादागिरी नही चलेगी, नही चलेगी अशा घोषणाही या महिला आंदोलकांनी दिल्या.
पीडित महिलेचा नेमका आरोप काय?
गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी गंभीर आरोप केलेत. माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. गेली 27 वर्षे मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. गणेश नाईक हे मला नुसते आश्वासन द्यायचे. आमच्या संबंधातून मला एक मुलगाही आहे. नाईकांनी मला आश्वासन दिलं होतं की, मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसं काहीच केलं नाही. नाईकांनी आम्हाला कोणतंच आर्थिक पाठबळ दिलं नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुला झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझं लैंगिक शोषण झालं, असा आरोप दीपा चौहान यांनी केलाय.
तसंच नाईक आणि त्यांच्या परिवारानं मला अनेकवेळा अपमानास्पद वागणूक दिली. अनेकवेळा त्यांच्या मुलाकडून मला धमक्याही देण्यात आल्या. एकदा माझा मुलगा त्यांच्या बालाजी टॉवर या राहत्या घरी गेल्यावर त्याला हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मी स्वत: मुलाला घेऊन गेल्यानंतर आम्हाला हाकलून देत, अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
माझा शारीरिक आणि मानसिक छळ नाईक यांनी केलाय. आता त्यांच्याविरोधात अनेक संघटना, पक्ष पुढे येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होतेय. पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. मला न्याय आणि माझा हक्क मिळाला पाहिजे. मी वकिलामार्फत माझी लढाई लढत आहे, अशी माहितीही चौहान यांनी दिलीय.
इतर बातम्या :