राजकीय धुराळ्यानंतर राज्यपालांचं एक पाऊल मागे, उद्घाटन टाळलं, साधी पाहणीही नाही!
उदघाटन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही.
नांदेड : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) आज नांदेड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते नांदेड विद्यापीठातील वसतीगृहाचं उद्घाटन पार पडणार होतं. मात्र आरोप प्रत्यारोपानंतर आणि राजकीय धुराळ्यानंतर राज्यपालांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. नांदेड विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन करण्याचं राज्यपालांनी टाळलंय.
राजकीय धुराळ्यानंतर राज्यपालांचं एक पाऊल मागे
उदघाटन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही. उद्घाटन नाही तर नाही कमीत कमी राज्यपाल तिथे थांबून वसतीगृहाची पाहणी तरी करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी उद्घाटन टाळून होणारा वादही टाळला.
राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या नांदेड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह
नांदेड विद्यापीठातील दोन नव्या वसतिगृहाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार होतं. त्यासाठी नांदेड विद्यापीठाने जय्यत तयारी केली होती. या दोन्ही नव्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आलंय. मात्र, राज्यपालांच्या या दौऱ्यावर अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केल्यानंचर राज्यपालांनी उद्घाटन करण्याचं टाळलं.
सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांचा अतिरेक
राज्यपालांचा नांदेड दौरा हा व्यापाऱ्यांच्या मुळावर आल्याचे चित्र आहे. बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक करत राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरची दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत. विशेषतः नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा अतिरेक जास्तच दिसून आलाय. पोलिसांनी रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
राज्यपालांचा दौरा आमच्या मुळावर उठलाय, व्यापाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
एकतर कोरोना आणि त्यात लॉकडाऊनमुळे आम्ही पुरते त्रस्त झालोय. परत त्यात दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात राज्य शासनाचे विविध नियम. अशा परिस्थितीत आज राज्यपालांचा दौरा होतोय. मात्र सुरक्षेच्या नावाखाली खरंच अतिरेक होतोय. राज्यपालांचा दौरा आमच्या मुळावर उठलाय, अशा प्रतिक्रिया नांदेडचे व्यापारी व्यक्त करत होते.
राज्यपाल तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर
आज नांदेड, उद्या हिंगोली आणि परवा परभणी असा त्यांचा दौरा असणार आहे. महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतरही दौरा होत असल्यानं त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.
(Governor BhagatSinh Koshyari avoided inaugurating Nanded University hostel)
हे ही वाचा :
राज्यपालांचा नांदेड दौरा व्यापाऱ्यांच्या मुळावर, बंदोबस्ताच्या नावाखाली दुकाने बंद करण्याचे आदेश