ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात खोळंबा.. सर्व्हर डाऊन, कुठे काय स्थिती?
तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून केली जातेय.
मुंबईः राज्यभरातील जवळपास 7, 751 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Grampanchayat Election) उमेदवारी अर्ज (Candidature form) भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. उद्या 2 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर (Election Commission) अर्ज भरताना मोठा तांत्रिक अडथळा येत आहे. औरंगाबाद, जालना, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमेदवारांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. विविध ठिकाणी नेट कॅफेवर इच्छुकांच्या आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून केली जातेय.
जालन्यात काय स्थिती?
जालना जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. उत्सुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तारीख वाढवून द्यावी आणि उमेदवारी अर्ज ऑफ लाईन घ्यावे अशी मागणी करत आहेत.
बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र ऑनलाईन प्रक्रिया करत असताना मोठी दमछाक होताना दिसतेय. वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने एक फॉर्म भरण्यासाठी दीड तास वेळ लागत आहे. उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे. अर्ज भरण्याची उद्या शेवटची मुदत आहे, त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत.
धुळ्यात काय स्थिती?
धुळे जिल्ह्यात सद्या 128 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरावी लागत आहेत मात्र इच्छुक उमेदवारांना या निवडणूक प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज लागत असून, सतत सर्व्हर डाऊन असल्याने इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरले जात नाहीत. काही उमेदवार अर्ज भरण्यासाठी रात्रीपर्यंत थांबतात मात्र रात्रभर जागूनही ऑनलाईन अर्ज भरले जात नाही अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागात तर अधिकच बिकट अवस्था आहे.
रत्नागिरीतही अडचणी
रत्नागिरीतदेखील रात्रभर इच्छुक उमेदवारांचा सायबर कॅफे मध्ये मुक्काम होता. पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी रात्रीपासून धावपळ दिसून आली.
गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या असुन 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असुन 2 डिसेंबर ला उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असुन उमेदवारांनी केफे मध्ये फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली आहे.