गणेश नाईकांना हिरवा कंदील, मंदा म्हात्रेंचा पत्ता कट होण्याची शक्यता
नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले गणेश नाईक (Manda Mhatre Ganesh Naik Belapur) यांना पक्षाने हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांच्या विभागवार कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत.
मुंबई : भाजपकडून नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre Ganesh Naik Belapur) यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण, नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले गणेश नाईक (Manda Mhatre Ganesh Naik Belapur) यांना पक्षाने हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांच्या विभागवार कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत. नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून नुकताच भाजप प्रवेश केला होता.
काहीही झालं तरी बेलापूरची आमदार मीच असेल, असं मंदा म्हात्रेंनी गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावेळी सांगितलं होतं. गणेश नाईक यांना पक्षात घेण्यासाठीही मंदा म्हात्रे यांचा विरोध होता. पण पक्षाकडून त्यांची समजूत घालण्यात आली. गणेश नाईकांच्या पक्षप्रवेशालाही मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. पण अखेर मंदा म्हात्रे यांना तिकीट कापण्याची भीती होती आणि तेच होण्याची शक्यता आहे.
भाजपची दिल्लीत बैठक
उमेदवार ठरवण्यासाठी भाजपची पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेही बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत 288 जागांचा आढावा घेतला जात आहे. युती न झाल्यास भाजपकडून स्वबळाचीही चाचपणी सुरु असल्याचं बोललं जातंय.
शिवसेनेचाही बेलापूर मतदारसंघावर दावा
विधानसभा निवडणुकीनंतर मी बेलापूरमध्ये पुन्हा येणार त्यावेळी विजयी जल्लोष केला जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यामुळे बेलापूरमधून शिवसेना निवडणूक लढवणार (Shivsena eyes on Belapur) असल्याचे तर्क लढवले जात आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
शिवसेना नेते विजय नाहता यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत भाजपवर कुरघोडी करुन त्यांची बेलापूरमध्ये मुस्कटदाबी करण्याची व्यूहरचना ‘मातोश्री’वर सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांचा विजय संकल्प मेळावा वाशीमध्ये आयोजित केल्याने हे दिसून आलं.
नवी मुंबई, ठाण्यात गणेश नाईक यांचं वर्चस्व
गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे.
गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.