चावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप
महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे" अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला. (Gulabrao Patil on Raksha Khadse)
जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख दिसल्याने एकच खळबळ उडाली. असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. (Gulabrao Patil reacts on Raksha Khadse derogatory reference on BJP official website)
“फक्त चौकशी नाही, शिक्षा करा”
“या प्रकारासंदर्भात आपल्याला नुकतीच माहिती मिळाली. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह लिहित असेल, तर त्याची फक्त चौकशीच नव्हे, तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे” अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.
रक्षा खडसे काय म्हणाल्या?
“भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरु आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसेंनी दिली.
माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आलेत, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा
“भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल”, असं अनिल देशमुख ट्विटरवर म्हणाले आहेत.
Shocking to see such a derogatory description of Raksha Khadse, BJP MP from Maharastra on the official site of the BJP. Maha Govt. will not tolerate this disrespectful behaviour towards women. @BJP4India must take action against those responsible or @MahaCyber1 will step in. https://t.co/wKVilGB79I
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 27, 2021
रक्षा खडसेंबाबत खरंच अपमानास्पद शब्द?
दरम्यान, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्याबाबत अजूनही असा काही उल्लेख आहे का? याची शाहनिशा करण्यासाठी आम्ही याबाबत पडताळणी केली. मात्र, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आम्हाला तसा काही उल्लेख आढळला नाही. कदाचित स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर बदल करण्यात आल्याची शक्यता आहे किंवा दुसरं काही कारण असण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा
वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख भाजपकडून नाही, रक्षा खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांशी चर्चा
(Gulabrao Patil reacts on Raksha Khadse derogatory reference on BJP official website)