Hanuman Chalisa Politics : तर ‘मातोश्री’ रावणाची लंका होईल, राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; हनुमान चालीसा पठणाचाही निर्धार
आज नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही तर मातोश्री रावणाची लंका होईल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
सुनील उमाप, अमरावती : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असेलल्या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navnneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनीही उडी घेतलीय. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान शिवसेनेला दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेनंही आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी रात्री राणा यांच्या घरासमोर आंदोलन करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसाही लावली. त्यानंतर आज नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही तर मातोश्री रावणाची लंका होईल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
‘मातोश्री’समोर येऊन हनुमान चालीसा वाचणार- रवी राणा
‘मातोश्री’वर रामराज्य पाहिजे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये हनुमान चालीसा वाचली पाहिजे. महाराष्ट्राची साडेसाती दूर करायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचली पाहिजे. मुख्यमंत्री दिशाहीन झालेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या समृद्धीसाठी शिवसैनिकांना घेऊन हनुमान चालीसा वाचावी. मातोश्रीवर असेलल्या सर्व शिवसैनिकांनी हनुमान चालीसा वाचली पाहिजे. मला विरोध करुन फायदा नाही. मी हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा वाचणार आहे. मला कुणीही रोखू शकत नाही, असा इशाराच रवी राणा यांनी दिलाय.
उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला साडेसाती- नवनीत राणा
खासदार नवनीत राणा यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. शिवसैनिकांनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना विचारावं की बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आहे की नाही? उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा वाचावी. मी दरवर्षी हनुमान चालीसाचं पठण करते. मुख्यमंत्र्यांना फक्त एकदा म्हणतेय. उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे. ती दूर होण्यासाठी हनुमान चालीसाचं पठण केलं, असा टोलाही नवनीत राणा यांनी लगावलाय. तसंच मातोश्रीबाहेर काही अतिरेकी येणार नाहीत. मला वेळ आणि तारीख द्यावी. मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचणारच. मी मुंबईची लेक आणि विदर्भाची सून आहे. मला कुणी रोखू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.
इतर बातम्या :