कदाचित अडवाणी गटाचा असल्यामुळे मंत्रीपद दिलं नसावं : शत्रुघ्न सिन्हा
नवी दिल्ली : अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खदखद अखेर बोलून दाखवली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते भाजपात राहून पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. पण एका चॅनलच्या कार्यक्रमात त्यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवली. शिवाय एका टीव्ही अभिनेत्रीला मंत्रीपद देता, मी काय वाईट होतो, […]
नवी दिल्ली : अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खदखद अखेर बोलून दाखवली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते भाजपात राहून पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. पण एका चॅनलच्या कार्यक्रमात त्यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवली. शिवाय एका टीव्ही अभिनेत्रीला मंत्रीपद देता, मी काय वाईट होतो, असा सवालही त्यांनी केला.
“अडवाणी गटाचा असल्यामुळे मंत्रीपद दिलं नसावं”
शत्रुघ्न सिन्हा मोदींवर सतत निशाणा साधत असतात. यावर त्यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले, “माझा विरोध पंतप्रधान मोदींना नाही, तर मुद्द्यांना आहे. कदाचित मी अडवाणी गटाचा असल्यामुळे मंत्रीपद दिलं नसावं. याबद्दल मला काही सांगता येणार नाही. माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप आहे का? तुम्ही एका टीव्ही अभिनेत्रीला मंत्रीपद देऊ शकता, आणि मला सांगितलं जातं, तुम्हाला अनुभव नाही. अटलजींची भाजपा आणि मोदींची भाजपा पूर्णपणे वेगळी आहे. अटलजींच्या वेळी लोकशाही होती, आज हुकूमशाही आहे, असं म्हणत सिन्हा यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
“अमित शाह कुणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नाहीत”
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांची युती सोने पे सुहागा असल्याचं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. या युतीमुळे भाजपाध्यक्ष अमित शाह (Amit Shah) आता कुणाला भेटण्याच्या अवस्थेत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. अमित शाह तीन राज्यांच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे भेट झाली नाही. पण आता ते कुणाला भेटण्याच्या मनस्थितीत नाहीत, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
भाजप सोडण्यावरही शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलखुलासपणे उत्तर दिलं. त्यांनी स्वतःच मला पक्षातून काढून टाकावं, असं ते म्हणाले. शिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं शत्रुघ्न सिन्हांनी कौतुकही केलं. राजकारणात काही मिळवण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे जे सत्य आहे, ते बोलतो, असं शत्रुघ्न सिन्हांनी स्पष्टपणे सांगितलं.
“मोदींना भेटू दिलं जात नाही”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटू दिलं जात नसल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी नाराजी व्यक्त केली. “मी नैतिकतावादी व्यक्ती आहे. मला बोलण्यासाठी पक्षाचं व्यासपीठ मिळत नाही, म्हणून जाहीरपणे बोलतो. एकदा पंतप्रधान मोदींना फिडबॅक देण्यासाठी भेटायला गेलो, तर मला सांगितलं की पक्षाध्यक्षांना भेटा. मी कुणाचीही तक्रार करत नाही. मी फक्त आरशात पाहतोय. व्यक्तीपेक्षा मोठा पक्ष आणि पक्षापेक्षा मोठा देश असतो. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे मी मीडियासमोर बोलतो,” असं त्यांनी सांगितलं.