घरात बसू, पण शिवसेनेशी गद्दारी आमच्या स्वप्नातही येणार नाही : सुनील शिंदे
या सर्वांवर स्पष्टीकरण देत सुनील शिंदे यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेशी गद्दारी करणं आमच्या स्वप्नातही येणार नाही, असं त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण सचिन अहिर यापूर्वी ज्या मतदारसंघाचे आमदार होते, त्या मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. या सर्वांवर स्पष्टीकरण देत सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेशी गद्दारी करणं आमच्या स्वप्नातही येणार नाही, असं त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
सचिन अहिर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला, वरळीचे स्थानिक आमदार म्हणून मी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. तिथे उमेदवारी कुणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी आमच्या पक्ष नेतृत्वाचा निर्णय असेल, असं सुनील शिंदे म्हणाले.
मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. माझं कुटुंब आणि मी शिवसैनिक आहोत. शिवसेना आम्ही फायद्या किंवा तोट्यासाठी कधीच मानली नाही. शिवसेना आमचा जीव आहे. शिवसेनाप्रमुखांवर निष्ठा आहे. पदांवर राहून कामे केली, त्याची पोचपावती मिळाली. आमदारकी मिळाली. राजकारण, आमदारकी हे काही आमचं सर्वस्व नाही. भविष्यात आमच्यासाठी संघटना काही निर्णय घेईल याची मला खात्री आहे. शिवसेनेशी गद्दारी आमच्या स्वप्नात येणार नाही. एकवेळ घरात बसू, असं म्हणत त्यांनी वृत्त खोडून काढलं.
अन्य कुठल्या पक्षात जाण्याची कल्पना मी स्वप्नात देखील करू शकणार नाही. आम्हाला पद मिळालं नाही तर चालेल, पण संघटनेशी बेईमानी मनातही येणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
कोण आहेत सुनील शिंदे?
- 2007 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं
- 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार
- 2014 च्या निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळवली, सचिन अहिर यांना 37613 मतं मिळाली
- 2015 ला उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी
संबंधित बातम्या
आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?