जर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद, शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला काय?
Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole resigns) यांनी राजीनामा दिल्याने, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे.
मुंबई : काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये पदांची देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चा सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole resigns) यांनी राजीनामा दिल्याने, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदामध्ये (Maharashtra Deputy Chief Minister) रस दाखवला आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरुन (Congress Maharashtra president) घासाघीस सुरु आहे. त्याचे पडसाद आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उमटताना दिसत आहेत. कारण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या (Congress) शर्यतीत आहेत. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदापेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हवं आहे. (If Congress gets the post of Deputy Chief Minister, Shiv Sena gets the post of Assembly Speaker, then what about NCP?)
नाना पटोलेच नाही तर काँग्रेसने देखील हे पद आपल्याकडून सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्याबदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवं आहे. म्हणजेच विधानसभा अध्यक्षपद घ्या आणि उपमुख्यमंत्रिपद द्या, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्याला शिवसेनेने होकार दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. असं झालं तर दोन्ही पक्षांचं एकमत होईल, पण राष्ट्रवादीला काय मिळणार हा प्रश्न आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादीला काय?
दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात ही पदांबाबत चर्चा होत असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्याच्या सरकारमधील तिन्ही पक्षांमधील दुवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे जे प्रस्ताव आहेत, ते राष्ट्रवादीला मान्य होतीलच असे नाही. राष्ट्रवादीही एखाद्या पदावर दावा सांगू शकते, असं राजकीय जाणकार सांगतात.
राष्ट्रवादीकडे सध्या काय काय?
ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महत्त्वाची पदं आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा जास्त मंत्रिपदं राष्ट्रवादीकडे आहेत. खात्यांबाबतच बोलायचं झाल्यास, उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह, जलसंपदा, गृहनिर्माण, सहकार, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आरोग्य अशी तगडी मंत्रालयं राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादीकडे तब्बल 16 मंत्रालयं आहेत.
काँग्रेस आणि शिवसेनेकडे किती खाती?
ज्यावेळी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला, त्यावेळी राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली होती. त्याआधी उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.
राष्ट्रवादीचे मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री) – बारामती (पुणे) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे) धनंजय मुंडे – परळी (बीड) अनिल देशमुख – काटोल (नागपूर) हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर) राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा) नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई) राजेश टोपे – उदगीर (लातूर) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे) बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा) दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे) आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)
यापूर्वी जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
उपमुख्यमंत्रिपद देण्यास शिवसेना तयार?
काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली असली तरी त्याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत कोणी भाष्य केलेलं नाही. मात्र शिवसेनेने त्याला अनुकूलता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसने शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याला शिवसेनेने होकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसही या देवाण-घेवाणीत एखादं पद, महामंडळ किंवा अन्य काही पदरात पाडून घेईल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या
महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी, काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली