मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन : रोहित पवार
जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेल. तसेच इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करतोय संधी द्यायची की नाही हे पार्टी ठरवेल.
अहमदनगर : “जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. तसेच इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करतोय, संधी द्यायची की नाही हे पार्टी ठरवेल. मात्र या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नाही”, असा विश्वास आमदार रोहित पवार (Rohit Pawar NCP) यांनी व्यक्त केलाय. कर्जत-जामखेडमधील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर टीव्ही 9 सोबत बोलताना रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“बोलणारे बोलत असतात मात्र मी सामाजिक आणि व्यावसायिक कामं करतो. तेव्हा लोकांची इच्छा असते काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे. मात्र अशी जबाबदारी आल्यास ती स्वीकारावी लागेल. परंतु पदाची अपेक्षा न ठेवता मी काम करत आहे”, असं रोहित पवार (Rohit Pawar NCP) यांनी सांगितले.
तुम्हाला मंत्री आणि जिल्ह्याच पालकमंत्री व्हायला आवडेल असा प्रश्न विचारल्यानंतर रोहित पवार म्हणाले, “आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मात्र पार्टी व्यक्तिगत चालत नसते त्यात अनेक घटकांचा विचार केला जातो. त्यात अनेक समीकरणे असतात त्यात मला किती वाटलं मला संधी द्यावी आणि जर संधी दिली तर मी त्याच सोन करेल. मात्र इतरही आमदार महत्वाचे असून या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नाही”.
अधिवेशनात खूप काही शिकायला मिळाले
“अधिवेशन चांगले होते त्यात आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्यात मांडलेले प्रश्न पुढील काळात सुटतील अशी अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले गेले. विरोधकांनी थोडा गोंधळ घातला. मात्र त्याची सवय झाल्याने फार काही वेगळं वाटलं नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
राम शिंदेंवर टीका
“अनेक लोकांना बोलायला आवडते भाषणामध्ये आश्वासन आणि टाळ्या मिळवणं तसे सोपे असते. मात्र काम करणे अवघड असते त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यांच्याकडे योग्य भाषण करुन शाब्दिक आश्वासन देणे ही कला खूप चांगली होती. पण अधिकाऱ्यांनकडून पाठपुरावा करणे ही क्षमता त्यांच्याकडे नसावी”, अशी टीका राम शिंदे यांचं नाव न घेता रोहित पवारांन केली.
अमृता फडणवीसांच्या टीकेवर रोहित पवारांचे उत्तर
“ही लोकशाही आहे मात्र भाजप लोकशाहीचा विचार करत नाही. जर एखादी व्यक्ती स्वतःचे मत व्यक्त करत असेल तर त्याला लोकशाही म्हणतात. हीच तर खरी ताकद असून ती ताईंना कळली मात्र इतर भाजपच्या लोकांना ती कळावी”, अशी टीका रोहित पवार यांनी केली.