…तर मी राजकारणातून बाहेर पडेन : उदयनराजे भोसले
साताऱ्यात पाणीप्रश्नावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. नुकतेच माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी रामराजे नाईक-निंबाळकरांवर जहरी टीका केली होती.
सातारा : साताऱ्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. नुकतेच माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी रामराजे नाईक-निंबाळकरांवर जहरी टीका केली होती. त्यानंतर रामराजेंनी भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उदयनराजे भोसलेंनीही रामराजेंना आक्रमक उत्तर दिले. मात्र या सर्व प्रकरणानंतर उदयनराजेंनी राजकारणातून बाहरे पडेन, असं वक्तव्य केलं आहे.
“माझं काय चुकलं ते सांगा. जनतेचा प्रश्न मांडणं काही चुकीची गोष्ट नाही. माझा त्रास होत असेल, तर मी स्वतः राजकारणातून बाहेर पडेन. पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून लावूनही अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने आम्ही प्रश्न विचारला. त्यानंतर आम्हाला पिसाळलेलं कुत्र बोलणं योग्य होतं का”, असाही प्रश्न उदयनराजेंनी टीव्ही 9 सोबत बोलताना उपस्थित केला.
काही दिवसांपासून जिल्ह्यात पाणी प्रश्नावरुन चागंलाच वाद पेटलेला दिसत आहे. मुंबईतही शरद पवारांनी बैठक बोलावली. या बैठकीच्या वेळी उदयनराजेंनी बैठकीतून काढता पाय घेत रामराजेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असा थेट हल्ला उदयनराजेंनी निंबाळकरांवर केला.
रामराजे निंबाळकर काय म्हणाले?
“जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत, तोपर्यंत माझी भूमिका सुद्धा पिसाळलेलीच असेल,” असे म्हणत रामराजे निंबाळकरांनी उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरेंवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही, तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत,” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली.