मी गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केलं, राणेंच्या खड्या सवालाला शिवसेनेचा पहिला जवाब!
Sanjay Raut | बाळासाहेबांचे तुम्ही काय होतात आणि आम्ही काय होतो, हे सगळं विसरून बाळासाहेब शिवसेना पुढे घेऊन गेले. आमच्यासारख्या सामान्य आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर पोहोचवले. याची जाण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात गंगेचा प्रवाह निर्माण केला होता. त्यामध्ये नारायण राणे यांच्यासारख्या अनेकांना शुद्ध करून घेण्यात आलं. त्यामुळे शिवसेनेने नारायण राणे यांना त्याकाळी मुख्यमंत्री केल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर नुकतीच टीका करण्यात आली होती. राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याचा उल्लेख या अग्रलेखात होता. हाच धागा पकडत नारायण राणे यांनी, ‘मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मुख्यमंत्री का केलं?’, असा रोकडा सवाल शिवसेनेला विचारला होता.
या प्रश्नाला संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना तितकेच चोख प्रत्युत्तर दिले. त्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी गंगेचा प्रवाह निर्माण केला होता. त्यामध्ये नारायण राणे आणि आमच्यासह सगळ्यांना शुद्ध करुन घेतलं होतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. नारायण राणे यांनी शिवसेनेचे उपकार मानले पाहिजेत. बाळासाहेबांचे तुम्ही काय होतात आणि आम्ही काय होतो, हे सगळं विसरून बाळासाहेब शिवसेना पुढे घेऊन गेले. आमच्यासारख्या सामान्य आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर पोहोचवले. याची जाण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
‘केंद्रीय मंत्री म्हणून काम करा, इकडे येऊन बेताल बडबड करू नका’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्यासाठी नारायण राणे यांनी चांगले काम करुन देश पुढे न्यायला हवा. पण ते महाराष्ट्रात येऊन केवळ बेताल बडबड करणार असतील तर शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात विधायक टीकेची परंपरा आहे. तशी टीका झाल्यास शिवसेना त्याचे स्वागत करेल, असेही राऊत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखातले 5 स्फोटक मुद्दे
राणेंवरील कारवाईनंतर नाशिक भाजप आक्रमक, मुख्यमंत्री आणि संजय राऊतांविरोधात 3 तक्रार अर्ज
(Shivsena MP Sanjay Raut take a dig at BJP Union Minister Narayan Rane)