Imtiaz Jaleel : उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं एमआयएमकडून स्वागत! पाणी प्रश्नावरुन मात्र शिवसेनेवर टीका
बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुसलमानांचा द्वेष करा असं सांगितलं नाही, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं स्वागत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. मात्र, औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्नावरुन जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी औरंगाबादेतून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. औरंगाबादच्या पाणी प्रश्नापासून ते काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) मुद्द्यापर्यंत अनेक विषय उद्धव ठाकरे यांनी हाताळले. महत्वाची बाब म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपवर टीकास्त्र डागलं. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुसलमानांचा द्वेष करा असं सांगितलं नाही, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं स्वागत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलंय. मात्र, औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्नावरुन जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.
‘त्यांचं स्वागत, पण बाबरी मशिदीवर किती दिवस बोलणार?’
इत्मियाज जलील म्हणाले की, मी त्यांचे स्वागत करतो. मी इस्लाम धर्माच्या विरोधात नाही असा उल्लेख त्यांनी भाषणात केला. दुसरं म्हणजे भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने माफी मागावी असंही ते बोलले, ते योग्यच आहे. पण बाबरी मशिदीवर किती दिवस बोलणार? सर्वात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. त्यासाठी मी एक पत्र लिहिलं होतं. पण मुख्यमंत्री जे बोलले त्यावरुन येत्या दोन वर्षात औरंगाबादला पाणी मिळणार नाही. अजून तीन वर्षे तरी औरंगाबादला पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, अशी टीकाही जलील यांनी केलीय.
‘औरंगाबादला मेट्रो नाही, फ्लायओव्हर हवे आहेत’
तसंच पालकमंत्री सुभाष देसाईसाहेब औरंगाबादेत उद्योग कुठला येणार यावर बोलले असते तर बरं झालं असतं. पाणी कधी मिळणार हे सांगा. मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा होती. औरंगाबादला मेट्रोची गरज नाही. औरंगाबादला फ्लायओव्हर हवे आहेत. मुख्यमंत्रीसाहेब काही ठोस बोलतील असं वाटलं होतं. त्यांचा रोष भाजप आणि राज ठाकरेंवर दिसला. शहराचा विकास आधी करणार मग नामांतर हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. याचा अर्थ असा की 3 ते 4 वर्षे नामांतराचा मुद्दा येणार नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. त्याचबरोबर महाविकास आघाडी किंवा भाजपकडून अद्यापही आमच्याशी संपर्क साधण्यात आला नाही. त्यांनी भीतीमुळेच आमदारांना कोंडलं आहे, अशी टीकाही जलील यांनी केलीय.
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं. ‘मी आज पहिल्यांदा मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करणार आहे. हिंदुत्वाचा तर आहेच, ते तर आमच्या धमन्यांमध्ये आहे. पण मुद्दाम मी संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मीच एकटा मूर्ख असेल तिकडे पाणी प्रश्न असतानाही जनतेला सामोरा जात आहे. याचं काण कुठेही फसवेगिरी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. तुमच्या मनात हा प्रश्न असेल की तुम्ही सांगता ते आम्ही ऐकतो पण तुमचं वर्क्तृत्व आमच्या काय कामाचं? पण आता फरक पडला की नाही ते तुम्हीच सांगायचं आहे. जुनी एक योजना आहे 1972 ची ती गंजून गेलीय, तिच्यासाठीही पैसे देतोय. समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन मी केलं होतं. दुर्दैवानं कोरोनामुळे एक वर्ष गेलं. पण मी केंद्रेकरांना सांगितलं आहे की हातात दंडा घ्या आणि आडवा येईल त्याला सरळ करा. पण आता स्टिलच्या किंमती वाढल्या आहेत. पण मी एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही. कंत्राटदार काम करत नसेल तर त्याला तुरुंगात टाकण्याचे आदेश मी दिले आहेत. कालही वाईल्ड लाईफची एक बैठक घेतलीय. जायकवाडीत विहिरीसाठी त्यांची परवानगी लागते’, असं मुख्यमंत्री म्हणाले.