सदस्यत्व रद्द केले, घर काढून घेतले, माझे घर लोकांच्या हृदयात, राहुल गांधी यांची टीका…
तेलंगणातील एका सभेत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ते येथे ओबीसी मुख्यमंत्री आणणार आहेत. अहो आधी २ टक्के तरी मते मिळवा आणि मग मुख्यमंत्र्यांबद्दल बोला...
Telangana Assembly elections 2023 | 26 नोव्हेंबर 2023 : संपूर्ण देशाला माहित आहे की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढतो. माझ्यावर 24 गुन्हे दाखल आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मला 5 दिवसांत 55 तास सतत प्रश्न विचारले. रात्री 2 वाजता माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले. माझे घरही काढून घेण्यात आले. पण, भारतात माझ्यासाठी करोडो घरे आहेत. माझे घर प्रत्येक गरीबाच्या हृदयात आहे. पूर्वी भारतीय जनता पक्षाचे लोक इथे छाती उघडे ठेवून फिरत होते. तेलंगणातील एका सभेत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ते येथे ओबीसी मुख्यमंत्री आणणार आहेत. अहो आधी २ टक्के तरी मते मिळवा आणि मग मुख्यमंत्र्यांबद्दल बोला, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली.
तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 30 नोव्हेंबरला येथे मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्यात देशातील प्रमुख नेते निवडणूक रॅली घेत आहेत. कॉंगेस नेते राहुल गांधी यांनी कामारेड्डी येथे जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपसह, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि एमआयएमवरही टीका केली.
पंतप्रधान मोदी आणि भारत राष्ट्र समिती (BRS) अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे एकमेकांशी संगनमत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदी हे त्यांच्यासोबत उभे नसतील तर के चंद्रशेखर राव यांच्यावर खटले का दाखल केले जात नाहीत? त्यांचे घर का घेतले नाही? असा सवाल त्यांनी केला.
तेलंगणात पंतप्रधान मोदी यांचे दोन मित्र आहेत. एक असदुद्दीन ओवेसी आणि दुसरे मुख्यमंत्री केसीआर. काँग्रेसने काय केले हे येथील मुख्यमंत्री विचारत आहेत. पण. काँग्रेसने काय केले हा प्रश्न नाही. तर, केसीआर आणि त्यांच्या पक्षाने राज्यासाठी काय केले हा प्रश्न आहे असा टोला त्यांनी लगावला. तेलंगणाचे मुख्यमंत्री संगणकीकरणाबाबत बोलतात. पण, जेव्हा केसीआर यांनी संगणकीकरणाची चर्चा केली. धारणी पोर्टल तयार केले. तेव्हा त्यांनी लाखो शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या आणि आपल्या उद्योगपती मित्रांना दिल्या असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यास पक्षाने दिलेले सहा हमीपत्र पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले जाईल. त्यांना कायद्याचे स्वरूप देऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे राहुल गांधी म्हणाले. तेलंगणातील जनतेला माहित आहे की काँग्रेस येथे प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकणार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.