India Alliance News : कमी मतं मिळाली असतानाही भाजप सत्तेत, कसं ते अशोक चव्हाण यांनी सांगितलं
इंडिया आघाडीची उद्या आणि परवा दोन दिवस मुंबई बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
मुंबई : मुंबईत इंडिया (India) आघाडीची पत्रकार परिषद (Press Conference) झाली. या परिषदेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेच्या उबाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. अशोक चव्हाण म्हणाले, महागाई, बेरोजगारी विरोधात नेहमी आवाज उठवत असतो. २०१९ च्या निवडणूक इंडियातील घटकपक्षांनी २३ कोटी मतं घेतले होते. भाजपला फक्त २२ कोटी मतं मिळाली होती. कमी मतं मिळाली असताना भाजप सत्तेत आले. कारण त्यावेळी इंडियातील काही घटकपक्ष एकत्र लढू शकले नव्हते. यावेळी हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत नक्की जिंकण्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, या इंडियाच्या आघाडीत ११ मुख्यमंत्री सहभागी आहेत. मध्यप्रदेश, गोवा आणि महाराष्ट्राला तोडण्याचे काम भाजपने केले. कर्नाटकात मात्र सरकार फोडल्यानंतर काँग्रेसची सरकार पुन्हा आली.
विकासाची काम करायची आहेत
राज्यात पुन्हा इंडियाची सरकार येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सर्व राजकीय पक्ष आमच्यासोबत आहेत. कोणाला विरोध करणे हा आमचा अजेंडा नाही. विकासाची कामं करायची आहेत. शिवाय देशातील फॅसिस्ट विचारसरणी थांबवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
राज्य संकटात असताना मदत केली पाहिजे
उद्धव ठाकरे म्हणाले, महिलांना राज्यात, देशात सुरक्षित वाटलं पाहिजे. सरकार गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे दर कमी केलेत. उद्या आणि परवा इंडियाची बैठक होत आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. राज्य आणि केंद्र सरकार काय करत आहे. संकटात असताना मदत केली पाहिजे. येऊन फक्त भुलभुलय्या करून चालत नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलोत
विचारधारा वेगवेगळी आहे. पण, संविधानाचे रक्षण करायची आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे. चले जावो, असं ब्रिटीशांना म्हटलं होतं. विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे. याचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. ही शपथ घेऊन पुढे जाणार आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं.