‘शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करेन’, स्मृतीदिनी इंदिरा गांधी यांचं शेवटचं भाषण…
इंदिरा गांधी यांचा आज स्मृतीदिन... यानिमित्त त्यांच्या शेवटच्या भाषणाची झलक...
मुंबई : इंदिरा गांधी… देशाच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान. इंदिरा गांधी (Indira Gandhi Death Anniversary) यांनी आधी काँग्रेस पक्ष आणि मग देशाची धुरा सक्षमपणे आपल्या हाती घेतली. देशासह परदेशातही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. त्यांचं भाषण म्हणजे शांत पण प्रभावशाली शब्दांची पेरणी होती. म्हणूनच इंदिरा यांच्या भाषणाला अभूतपूर्व गर्दी व्हायची. कायम गर्दीत वावरणाऱ्या इंदिरा यांची 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली. आज त्यांचा त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या शेवटच्या भाषणाची (Indira Gandhi last Speech) झलक…
इंदिरा गांधी यांच्या शेवटच्या भाषणातील शब्द ऐकले की कदाचित त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी, असं वाटतं. त्या म्हणाल्या होत्या, “मला आता कसलीच चिंता नाहीये. मी जिवंत राहो अगर न राहो… मी आयुष्यात दीर्घ अनुभव घेतलाय. या आयुष्याकडे मागे वळून पाहताना मला फक्त एका गोष्टीचा गर्व वाटतो, तो म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेत गेलं. माझी अशी इच्छा आहे की, जोवर मी जिवित आहे तोवर माझं आयुष्य लोकांच्या सेवेसाठीच असावं”, अशी इच्छा इंदिरा गांधी यांनी बोलून दाखवली.
पुढे बोलताना इंदिरा म्हणाल्या, “जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला या गोष्टीचं समाधान हवं असेल की, माझ्या रक्ताचा एक-एक थेंब एक-एका भारतीयाला जीवित करेल. मला आशा आहे की, महिला-तरूण माझ्या या संघर्षातून प्रेरणा घेतील आणि भारताचं भविष्य घडवतील”, असं इंदिरा गांधी यांनी आपल्या शेवटच्या भाषणात म्हटलं. त्यांनी ओरिसातील सभेला संबोधित केलं होतं. पुढे काहीच दिवसात इंदिरा यांची हत्या झाली.
राकेश शर्मा जेव्हा अंताराळ मोहिमेवर गेले होते. तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राकेश शर्मा यांना एक प्रश्न विचारला होता. अंतराळातून भारत कसा दिसतो? राकेश शर्मा यांनीही तितकंच समर्पक उत्तर दिलं होतं, “कोणतीही शंका मनात न ठेवता मी सांगू शकतो की, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा!” इंदिरा यांचा हा प्रश्न आणि राकेश शर्मा यांनी दिलेलं उत्तर आजही चर्चित आहे.