….. तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (NCP Minister Dhananjay Munde) यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (NCP Minister Dhananjay Munde) यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा (Renu Sharma) ही करुणा शर्माची (Karuna Sharma) बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Is Dhananjay Mundes ministry in danger zone?)
धनंजय मुंडेंच्या या फेसबुक पोस्टनंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतकंच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवते असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UddhavThackeray) आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री कारवाई करणार?
उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचं दर्शन एव्हाना महाराष्ट्राला झालं आहे. कोरोना काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि राज्याला दिलेला दिलासा सर्वांनी पाहिला आहे. शालीन आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर अॅक्शन घेणार का हा सवाल आहे. थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शरद पवार काय भूमिका घेणार?
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही प्रमाण मानला जातो. जर शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना पायउतार होऊन येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल, जर निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामारो जावं लागेल.
.. तेव्हा धनंजय मुंडेंना पवारांनीच जाब विचारला होता?
ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेच्या हालाचाली सुरु होत्या, त्यावेळी अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं होतं. सत्तेचं समीकरण जुळलं असताना अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेच शपथविधी उरकला होता. त्यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार दिसले होते. मात्र पहाटेच्या शपथेनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता दिवसभर गायब होता, तो नेता म्हणजे धनंजय मुंडे. त्यावेळी धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी खासगीत जाब विचारल्याचं राजकीय जाणकारांनी सांगितलं होतं. धनंजय मुंडे त्यावेळी पक्षादेश झुगारुन अजित पवारांसोबत गेल्याने, शरद पवार संतापल्याचं चित्र होतं. तोच संताप जर आता निर्णयात बदलला तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत, हे पक्कं होईल.
(Is Dhananjay Mundes ministry in danger zone?)
#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत
कालपासून समाज…
Posted by Dhananjay Munde on Tuesday, 12 January 2021
संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल