‘राष्ट्रवादीलाच खिंडार पाडल्याशिवाय राहणार नाही’, भाजपच्या जगदीश मुळीकांचं राष्ट्रवादीच्या जगतापांना जोरदार प्रत्युत्तर
प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा हा दावा केल्यानं पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रशांत जगताप यांचा हा दावा हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर येत्या काळात राष्ट्रवादीलाच खिंडार पडल्याशिवाय राहणार नसल्याचं जोरदार प्रत्युत्तर मुळीक यांनी दिलंय.
पुणे : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) तोंडावर पुण्यात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पुन्हा एकदा भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. भाजप नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा झाल्याचा दावाही प्रशांत जगताप यांनी केलाय. प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा हा दावा केल्यानं पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रशांत जगताप यांचा हा दावा हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर येत्या काळात राष्ट्रवादीलाच खिंडार पडल्याशिवाय राहणार नसल्याचं जोरदार प्रत्युत्तर मुळीक यांनी दिलंय.
प्रशांत जगताप यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. ज्या पक्षाचे महापालिकेत 40 ते 45 नगरसेवक आहे. त्या पक्षाचे शहराध्यक्ष हास्यास्पद वल्गना करत आहेत. जगतापांनी त्यांच्या पक्षातून भाजपमध्ये येण्याऱ्यांना थांबवून दाखवावं. आम्ही राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याशिवाय राहणार नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच जगताप अशी वक्तव्ये करत आहेत. पण प्रसिद्धीत राहून सत्ता मिळवता येत नाही, असा टोलाही मुळीक यांनी प्रशांत जगताप यांना लगावलाय.
प्रशांत जगतापांचा स्वबळाचा सूर
महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा बहुप्रतिक्षित प्रारूप आराखडा महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याच वेळी जगताप यांनी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका आपण शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठीकडे मांडणार आहोत. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आपणास मान्य असेल, असेही जगतात यांनी स्पष्ट यावेळी केले.
23 गावांमधील पाणीपुरवठ्याच्या आंदोलनावरुन मुळीकांचा पलटवार
पुणे शहरासह समाविष्ट गावांमधील विकासकामांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला गेल्या दोन वर्षांत निधी उपलब्ध करून देता आला नाही. राज्य सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेत 23 गावांमधील पाणीपुरवठ्यासंदर्भात आंदोलन केल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली होती.
भाजपच्या वतीने पुणे महापालिकेच्या माध्यमांतून विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. नुकतीच समाविष्ट गावांत 392 कोटी रुपये खर्च करुन मैलापाणी शुद्धीकरणासाठी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांचा तिळपापड झाला आहे. समाविष्ट गावांत विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 9 हजार कोटी रुपयांची गरज आहे. तशी मागणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली होती. परंतु राज्य सरकारने पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप मुळीक यांनी केला होता.
इतर बातम्या :