Maharashtra Election 2024 : प्रचाराला निघालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका
Maharashtra Election 2024 : त्यांना पाहण्यासाठी नातेवाईक मित्र परिवारासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रभाकर सोनवणे हे जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना ममुराबाद गावाजवळ त्यांना वाहनात हृदयविकाराचा झटका आला. घटनेनंतर तातडीने कार्यकर्त्यांनी त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
रुग्णालयात त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली असून दोन ब्लॉकेज निघाल्याची माहिती मिळाली आहे. प्रभाकर सोनवणे यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना पाहण्यासाठी नातेवाईक मित्र परिवारासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. प्रभाकर सोनवणे हे शिवसेना ठाकरे गटाचे चोपडा मतदारसंघाचे उमेदवार असून ठाकरे गटाच्या शेवटच्या यादीत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाकर सोनवणे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
चोपड्यात ठाकरे गटाला बदलावा लागलेला उमेदवार
प्रभाकर आप्पा सोनवणे यांची तब्येत आता चांगली असून ते लवकरच बरे होऊन प्रचारामध्ये सहभागी होतील, अशी माहिती प्रभाकर सोनवणे यांचे चिरंजीव दिनेश सोनवणे बोलताना दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने चोपडा विधानसभा मतदारसंघातून आधी राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे तडवी यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. प्रभाकर सोनवणे हे मूळचे भाजपाचे आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे आणि प्रभाकर सोनवणे यांच्यात सामना होणार आहे.