जळगाव जिल्हा दूध संघाच्या मतदानाला सुरुवात, खडसे विरुद्ध महाजन, कोण ठरणार अव्वल?
जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
जळगावः जळगावात (Jalgaon) आज जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जळगावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आज या लढतीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दूध संघाच्या 20 जागांसाठी मतदानाला साकळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे.
जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीला 441 जण मतदान करणार आहेत. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले आहे. या केंद्रावर 44 जण मतदान करणार आहेत.
जळगाव दूध संघ निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील सत्य वॉलभ मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला असल्याचे पाहायला मिळाले दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस पहायला मिळतेय. एकनाथ खडसे या निवडणुकीत एकटे पडल्याचं चित्र आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार खडसे यांच्याविरोधात आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण पाहता, शिंदे-भाजप गटासाठीदेखील ही लढाई सोपी नाही. त्यामुळे या राजकीय आखाड्यात कोण विजयी ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
हा तर कबड्डीचा सामना…
दरम्यान, जळगावचा हा सामना आमच्यासाठी कबड्डीचा सामना असल्याची प्रतिक्रिया क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर या सामन्याचा मी अंपायर आहे, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं. गिरीश महाजन यांनी त्यालाही उत्तर दिलं. अंपायर वगैरे नाही. तुम्ही आमच्यासमोर येऊन ही राजकीय कबड्डी खेळून जिंकून दाखवा, असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलंय.