जळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या, भररस्त्यात दगडाने ठेचून जीव घेतला!
जळगावमध्ये मनसेचे माजी शहराध्यक्ष श्याम दीक्षित यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे
जळगाव : जळगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Jalgaon MNS) माजी शहर उपाध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून श्याम दीक्षित (Shyam Dixit Murder) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
जळगावात सिंधी कॉलनीतील कासमवाडी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराच्या प्रांगणात श्याम दीक्षित यांचा मृतदेह आढळला. सकाळी सात वाजताच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मनसे कार्यकर्त्याची भररस्त्यात हत्या झाल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे. मध्यरात्री दगडाने ठेचून दीक्षित यांची हत्या करण्यात आली.
श्याम दीक्षित यांच्या हत्येचं कारण अद्याप उलगडलेलं नाही. राजकीय वैमनस्यातून दीक्षित यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र पोलिस अधिक तपास करत असून त्यानंतरच हत्येचं नेमकं कारण समोर येण्यास मदत होईल.
35 वर्षीय श्याम दीक्षित जळगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात राहत होते. त्यांनी मनसेच्या जळगाव शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी काही वर्षांपूर्वी सांभाळली होती. त्यांच्या हत्येमागे काही राजकीय कनेक्शन आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
मनसे कार्यकर्त्याची ठाण्यात आत्महत्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे काहीच दिवसांपूर्वी ठाण्यातील प्रवीण चौगुले (Pravin Chowgule) या तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. प्रवीणने मंगळवारी 20 ऑगस्टला रात्री उशिरा पेटवून घेऊन आत्महत्या केली होती.
प्रवीण चौगुलेने यापूर्वी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या वर्षीच मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय प्रवीण चौगुले मानसिकरित्या अस्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली होती.