Jalna | फडणवीसांसारखा मोठा नेता आणला, पण भाजपचा फुसका बार, घोडा मैदान जवळच, जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा इशारा
राज्यात काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपचं स्थानिक पातळीवर मात्र सूत जुळल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला. ते म्हणाले, ' स्थानिक पातळी वर काँग्रेस आणि भाजप चा साखरपुडा झाला आणि मधुचंद्र झाला.
जालना : देवेंद्र फडणवीसांसारखा (Devendra Fadanvis) मोठा नेता जालन्यात आणला. पण भाजपने जलाक्रोशासाठी काढलेला मोर्चा फुसका बार निघाला. हा मोर्चा नेमका कुणाच्या विरोधात होता, हे कळलंच नाही. हा मोर्चा पालिकेविरोधात नव्हता तर अर्जुन खोतकर यांना शिव्या देण्यासाठी होता, असा आरोप शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केला आहे. जालन्यातील पाणी प्रश्नावर भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आज विराट मोर्चा काढण्यात आला. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या नेतृत्वात असंख्य भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. आमच्या काळात मंजूर केलेल्या पाणी वितरण योजनेवर महाविकास आघाडी सरकारने तसूभरही काम केलं नाही. त्यामुळे जालन्यातील माता भगिनींवर पाण्यासाठी आक्रोश करण्याची वेळ आली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र हा मोर्चा म्हणजे फुसका बार निघाल्याची टीका शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली.
‘मोर्चाला केवळ 1500 लोक’
भाजपच्या मोर्चावर टीका करताना अर्जुन खोतकर म्हणाले ,’ भाजपचा मोर्चा फुसका बार निघाला. मोर्चाला केवळ 1500 लोक आले. फडणवीस सारख्या मोठ्या नेत्याला मोर्चाला आणलं. पण यातून काहीच निघाले नाही. मोर्चा कोणाच्या विरोधात होता हेच कळले नाही. ग्रामीण भागातील लोकांना आणण्यासाठी टार्गेट दिले होते. अनेक अडिओ क्लिप व्हायरल पण मोर्चा अपयशी ठरला.
‘इथे तर काँग्रेस-भाजपचा मधुचंद्र’
राज्यात काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपचं स्थानिक पातळीवर मात्र सूत जुळल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला. ते म्हणाले, ‘ स्थानिक पातळी वर काँग्रेस आणि भाजप चा साखरपुडा झाला आणि मधुचंद्र झाला.. हा मोर्चा पालिके विरोधात नव्हता तर अर्जुन खोतकर यांना शिव्या देण्यासाठी झाला..
‘औरंगजेब म्हणण्याचा निषेध’
रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटले, माझ्या मागे औरंगाबादचा औरंगजेब मागे लावून दिला आहे… यावर उत्तर देताना अर्जुन खोतकर म्हणाले, ‘ सत्तार यांना औरंगजेब म्हणणे चुकीचे मी त्याचा निषेध करतो, सत्तार यांना औरंगजेब म्हणणे म्हणजे त्यांना निवडून दिलेल्या लोकांचा अपमान आहे. आम्हाला खिशात ठेवण्याचे ते बोलतात याचा अर्थ त्यांचे खिसे आता मोठे झालेत, ते किती मोठे झालेत हे त्यांच्या जावयानेच सांगितले.. कोणी काय केले हे समोरा समोर येउत आव्हान स्वीकारू, घोडा मैदान जवळ आहे या..