महिलांबाबत बेताल विधानं सहन करणार नाही, ‘त्या’ नेत्यांची हकालपट्टी करा; जया बच्चन भडकल्या
जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. हे जगजाहीर आहे. आता मीही कोर्टात जाणार आहे. हा विनयभंगाचा गुन्हा होऊच शकत नाही हे आम्ही कोर्टालाही सांगणार आहोत.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडूनच महिलांवर अश्लील टिप्पणी केली जात आहे. महिलांना मानहानी सहन करावी लागेल अशी विधाने केली जात आहेत. त्यामुळे महिला खासदार आणि आमदारांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचला. या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालावं आणि अशा नेत्यांना अटकाव आणावा, अशी मागणी या महिला आमदार, खासदारांनी केली आहे.
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान, विद्या चव्हाण, आदिती तटकरे, आदिती नलावडे, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, ऋतुजा लटके, आमदार मनिषा कायंदे आदी महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. त्यानंतर या महिला नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला.
आम्ही महिलांचा अपमान सहन करणार नाही. उत्तर प्रदेशातही महिलांवर रोज अत्याचार होत आहे. दीदींवरील अत्याचार आता बंद करा. आम्ही ते सहन करणार नाही. महिला सशक्त होत आहेत. बलवान होत आहेत. अशावेळी त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न होत आहे, हे सहन केलं जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी व्यक्त केली.
जे लोक महिलांवर अशा पद्धतीने विधाने करतात त्यांना राजकारणातून काढून टाकलं पाहिजे. अशा लोकांमुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत आहे, असंही जया बच्चन म्हणाल्या. आम्ही लवकरच राष्ट्रपतींना भेटून आमचं म्हणणं मांडणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
महिलांवरील अश्लील शेरेबाजी खपवून घेतली जाणार नाही. कायद्याने अशा नेत्यांना लगाम घातला पाहिजे, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे. राज्यपालांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं असल्याचं म्हटलं आहे, असं खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहिली असेल तर त्यांनी ती चिठ्ठी जाहीर केली पाहिजे. त्या चिठ्ठीत काय लिहिलं हे महिलांनाही कळलं पाहिजे, असं सांगतानाच गृहमंत्रालयाचा वापर केला जात आहे. गृहखात्याकडून विरोधकांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. हे जगजाहीर आहे. आता मीही कोर्टात जाणार आहे. हा विनयभंगाचा गुन्हा होऊच शकत नाही हे आम्ही कोर्टालाही सांगणार आहोत. पण हा प्रकार कुणाच्या इशाऱ्याने होत आहे हे समोर आलंच पाहिजे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.
एखाद्या महिलेला गर्दीतून सभ्यपणे बाहेर करणं हा गुन्हा होऊच शकत नाही. हा गुन्हा असेल तर मुंबईत रोज एक दोन लाख गुन्हे दाखल करण्यात येतील. दोन दिवसात गुन्हे दाखल होत असेल तर फडणवीसांकडील गृहखातं मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतलं पाहिजे. खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला.
भीमा कोरेगावात इतरांवर गुन्हे दाखल केले. पण संभाजी भिडेंविरोधात गुन्हे दाखल झाले नाही. एकबोटेंविरोधात गुन्हे दाखल केले नाही. भाजपची मनमानी सुरू आहे. त्यामुळे शिंदेंनी हे खातं स्वत:कडे घ्यावं, असं त्या म्हणाल्या.
राज्यपालांनी याप्रकरणी मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी समज द्यावी. ज्यांनी घटनेची शपथ घेतली त्यांनी महिलांविरोधात बोलू नये. तसंच सेक्शन लागू केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना पत्रं दिल्याचं राज्यपाल म्हणाले. आम्ही आठ पंधरा दिवस वाट पाहू. त्या पत्रावर काय कारवाई होते हे पाहू. त्यानंतर आम्ही राष्ट्रपतींना भेटू. महिला राष्ट्रपती आहेत. त्यांच्याकडे आमच्या भावना व्यक्त करू, असं त्यांनी सांगितलं.