‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही’, जयंत पाटलांचा खोचक टोला
जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना कोणतीही घाई नाही. चंद्रकांत पाटलांनाच घाई झाली आहे. फडणवीसांचं नाव पुढे करुन ते बोलत आहेत. मात्र, त्यांना तिथे बसायचं आहे. असं असलं तरी त्यांचं नाव यादीतही नाही, अशा शब्दात चंद्रकांत दादांवर खोचक टीका केलीय.
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण आता तापायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुण्यातील भाजपच्या भव्य अशा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चंद्रकांत दादांना खोचक टोला लगावला आहे.
‘आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं स्वप्न आपण पाहतो आहोत, आणि जागेपणी पाहत आहोत. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहोत. लोकांचे आशीर्वाद मिळवत आहोत, असे आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस’, असं वक्तव्य पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलं होतं. या वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना कोणतीही घाई नाही. चंद्रकांत पाटलांनाच घाई झाली आहे. फडणवीसांचं नाव पुढे करुन ते बोलत आहेत. मात्र, त्यांना तिथे बसायचं आहे. असं असलं तरी त्यांचं नाव यादीतही नाही, अशा शब्दात चंद्रकांत दादांवर खोचक टीका केलीय.
साहित्य संमेनलातील भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया
दुसरीकडे नाशिकमध्ये सुरु असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर जिथे आमच्या आदर्शांना अपमानित केलं जातं तिथे जाण्यात काय अर्थ आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. त्याबाबत विचारलं असता, नाशिक ही कुरुमाग्रजांची भूमी आहे. थोर साहित्यिकांची भूमी आहे. त्यांच्याबद्दल अनादर दाखवत असतील तर काय त्यांच्यासारख्या समंजस व्यक्तीनं अनादर दाखवणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलीय.
साहित्य संमेलनाकडे फडणवीसांनी पाठ का फिरवली?
मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? साहित्य संमेलनात वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या :