तेव्हा मी सावत्र होतो का?, जितेंद्र आव्हाड यांची खदखद; कुणाला केला सवाल?
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचं शिर्डीत कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचं शिर्डीतील हे पहिलंच शिबीर आहे. या शिबीरातून शरद पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी अजितदादा गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच हल्ला चढवला आहे.
अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, शिर्डी | 3 जानेवारी 2023 : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. मला कोरोना झाला. मी आजारी असताना माझं पालकमंत्री काढून घेतलं. तेव्हा मी काय सावत्र होतो का? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना केला आहे. तसेच अजितदादांनी आपण इच्छुक असलेलं पालकमंत्रीपदही दुसऱ्याला दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शिर्डीत राष्ट्रवादीचं कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. या शिबिराला संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात मी मंत्री होतो. पण पालकमंत्री नव्हतो. तेव्हा पालकमंत्री ठरवण्याचं काम हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मिळून ठरवत होते. तेव्हा मी अजित पवार यांना भेटून पालकमंत्री पद मिळण्याची इच्छा व्यक्त केली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मी इच्छुक होतो. पण आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद हे देण्यात आलं. मी ज्येष्ठ आमदार नाही का? असा माझा तेव्हा त्यांना सवाल होता, असं सांगतानाच मला कोरोना झाला तेव्हा माझं पालकमंत्री पद काढून घेतलं. तेव्हा मी सावत्र होतो का? अजित पवार यांना सुद्धा कोरोना झाला होता. तेव्हा त्यांनी पालकमंत्रीपद का सोडलं नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. शरद पवार यांनीच मला सोलापूरचं पालकमंत्रीपद दिलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
तर संविधान समुद्रात बुडवलं जाईल
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दाव्यावरही टीका केली. खासदाराचा आकडा 400 पार होण्याचं स्वप्न तुम्ही पाहत आहात. सर्वजण स्वप्ने पाहू शकतात. स्वप्न मी सुद्धा पाहू शकतो. देशाची लोकशाही 100% नेस्तनाबूत करण्याचा काम हे केलं जाणार आहे. त्यासाठीच त्यांना 405 खासदार लागणार आहेत. असं झालं तर या देशाचं संविधान हे अरबी समुद्रात बुडवलं जाईल, असा दावाही त्यांनी केला.
तुम्ही एकनाथ शिंदे नाहीत, तर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. एखाद्या मुख्यमंत्र्याने धर्माचा वापर करुन वक्तव्य करणं, उचकावणं हे चुकीच आहे. तुम्ही आता एकनाथ शिंदे नाहीत, तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात. त्यामुळे एका धर्माला उचकावणं चुकीचं आहे. महारष्ट्राला आग आणि जाळपोळ हेच हवं आहे का? असा सवाल करतानाच संविधान टिकवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे पण मुख्यमंत्री तसं वागत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.