साहेब, उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत, काय मिळालं? : जितेंद्र आव्हाड
उदयनराजेंच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीकास्त्र सोडलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) भाजपमध्ये डेरेदाखल झाले. मात्र उदयनराजेंच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीकास्त्र सोडलं.
उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा उद्विग्न सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना विचारला. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करताच, जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करुन टीकास्त्र सोडलं.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“साहेब उदयनराजेंवर तुम्ही मानापासून प्रेम केले, सातारातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत. पोटच्या पोरावानी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही “यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला” असं टिव्ट जितेंद्र आव्हाड यांनी केले.
साहेब उदयनराजें वर तुम्ही मानापासून प्रेम केले सतारातल्या आपल्या जवळच्याना दुखावलत त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलत पोटच्या पोरावणी प्रेम केलेत खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही #साहेब काय मीळाले? पण तरीही “यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरदपवारांचा बालेकिल्ला”
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2019
मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्यरत – उदयनराजे
दरम्यान, या प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हतं. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले. मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्य करत असल्याचंही उदयनराजेंनी नमूद केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो आदर्श लोकशाहीसारखा होता. त्यांचं जसं अष्टमंडळ होतं, त्याचाच आधार घेऊन भारतात लोकशाही प्रक्रिया सुरु आहे. या लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात भाजप करत आहे.
भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. प्रत्येक राज्यात भाजप वाढत आहे. अनेक लोक भाजपशी जोडले जाण्यास इच्छुक आहे. त्यामागे हेच कारण आहे. लहानपणापासून काश्मीरचा विषय होता. मात्र, कुणीही त्याकडं लक्ष दिलं नाही. संपूर्ण देश एक राहावा, भारत मजबूत व्हावा म्हणून मोदींनी महत्त्वाची पाऊलं उचलली. ते निर्णय योग्य आहेत – उदयनराजे भोसले