ठाण्यात वेगवान घडामोडी, जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्तीयालाही धमकीचा फोन? पोलिसात काय तक्रार?
जितेंद्र आव्हाड यांनी यांदर्भाने एक सूचक ट्विटही केलंय. महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे या व्हिडिओत पैसे मोजताना दिसत आहेत.
निखिल चव्हाण, ठाणेः जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह सात जणांविरोधात काल गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्यात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरु झालेल्या या प्रकरणात नव-नवीन खुलासे आणि आरोप होत आहेत. महेश आहेर यांनी जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय शाहरूख सय्यद यांनाही संपवण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाहरुख सय्यद यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, महेश आहेर यांनी त्यांना १२ फेब्रुवारी रोजी फोनवरून धमकी दिली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर ज्या प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे, त्याचप्रमाणे महेश आहेर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आता जितेंद्र आव्हाड समर्थक तसेच मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
शाहरूख सय्यद काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय शाहरुख सय्यद म्हणाले, महापालिका अधिकारी महेश आहेर यांनी मला 12 तारखेला फोनवरून मला व जितेंद्र आव्हाड यांना संपवण्याची धमकी देण्यात दिली होती. या प्रकरणातून जितेंद्र आव्हाड यांना फसवण्याचा डाव आहे आणि हा खूप आधीच केला होता, अशी माहिती शाहरूख सय्यद यांनी दिली आहे. या धमकीवरून मी आता पोलिसात तक्रार देणार असल्याचंही शाहरूख यांनी म्हटलंय.
काय आहे नेमकं प्रकरण?
- बुधवारी संध्याकाळी जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आदींसह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या गेटवर एकाला मारहाण केली.
- यात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली.
- जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना मारण्याबाबतची एक ऑडिओ क्लिप या परिसरात व्हायरल झाली आहे. यातील आवाज महेश आहेर यांचा असल्याचा आरोप करण्यात येतोय.
- महेश आहेर यांनी दिलेली ही धमकी असल्याने आव्हाड समर्थकांनी महेश आहेरवर हल्ला केल्याचा आरोप आहेर यांनी केला.
- या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य ७ जणांवर मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
- जितेंद्र आव्हाड यांनी यांदर्भाने एक सूचक ट्विटही केलंय. महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे या व्हिडिओत पैसे मोजताना दिसत आहेत. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे, असं ट्विट त्यांनी केलं.
महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे श्री. म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत. @ThaneCityPolice @TMCaTweetAway @Dev_Fadnavis pic.twitter.com/GZHcUH82VK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 15, 2023
- या क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचाच असल्याचा दावा काँग्रेस नेते आनंद परांजपे यांनी केलाय. त्यामुळे आव्हाड यांच्याप्रमाणेच आहेर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.