Jogeshwari East Vidhan Sabha 2024 : रविंद्र वायकरांच्या पत्नीला शिवसेनेची उमेदवारी, पण विजयाचा मार्ग कठीण?
Jogeshwari East Vidhan Sabha 2024 : जोगेश्वरी पूर्वमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. जागेश्वरी पूर्व हा रविंद्र वायकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. नगरसेवक ते आमदार अशा निवडणुकांमध्ये त्यांनी सतत विजय मिळवला आहे. आता पत्नीला निवडून आणणं त्यांच्यासाठी सोपं नसेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काल रात्री उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेला सुद्धा शिवसेना शिंदे गटाने जोगेश्वरी पूर्वमधून कोणाला उमेदवारी दिलीय? त्याची चर्चा सुरु झाली आहे. जोगेश्वरी पूर्वमधून शिवसेना शिंदे गट कोणाला उमेदवारी देणार? त्याची उत्सुक्ता होती. शिवसेना शिंदे गटाने जोगेश्वरी पूर्वमधून मनिषा वायकर यांना उमेदवारी दिली आहे. मनिषा वायकर या रविंद्र वायकर यांच्या पत्नी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी रविंद्र वायकर यांनी ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना शिंदे गटाने तिकीट दिलं होतं.
अवघ्या 48 मतांच्या फरकाने त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. सगळ्या मुंबईत या विजयाची चर्चा झाली होती. रविंद्र वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झालेला. रविंद्र वायकर यांना 4,52,644 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल किर्तीकर यांना 4,52,596 मतं मिळाली. या निवडणूक निकालाची भरपूर चर्चा झाली. जोगेश्वर पूर्व हा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा क्षेत्रात येतात.
जोगेश्वरी पूर्वमध्ये वायकरांसमोर चॅलेंज काय?
यात जोगेश्वरी पूर्व या स्वत:च्या मतदारसंघात रविंद्र वायकर लोकसभेला पिछाडीवर आहेत. अमोल किर्तीकर यांना जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 83,409 मतं मिळाली, तेच रविंद्र वायकर यांना 72,118 मतं मिळाली. म्हणजे ठाकरे गटाकडे जवळपास 11 हजार मतांची आघाडी आहे. पत्नी मनिषा यांना निवडून आणण्यासाठी वायकरांना ही आघाडी मोडावी लागेल. जोगेश्वरी पूर्वमधून ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार? त्यावरही बरच काही अवलंबून असेल. ठाकरे गटाकडून अनंत नर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अनंत नर हे एकवेळ रविंद्र वायकर यांचे अत्यंत निकटवर्तीय होते.
रविंद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. 1992 ते 2009 असे चारवेळा ते जोगेश्वरीमधून नगरसेवक होते. त्यानंतर आमदार, मंत्री बनले. ईडीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला होता.
याआधीच्या जोगेश्वरी पूर्वच्या तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल बघूया.
2009 विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मतं |
---|---|---|
रविंद्र वायकर | शिवसेना | 64318 (विजयी) |
भाई जगताप | काँग्रेस | 50543(पराभूत) |
2014 विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मतं |
---|---|---|
रविंद्र वायकर | शिवसेना | 72767 (विजयी) |
उज्वला मोडक | भाजपा | 43805 (पराभूत) |
2019 विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मतं |
---|---|---|
रविंद्र वायकर | शिवसेना | 90654 (विजयी) |
सुनील कुमरी | काँग्रेस | 31867 (पराभूत) |