Ketaki Chitle Arrest : कळंबोलीत केतकी चितळेवर शाईफेकीचा हल्ला, काही क्षण गोंधळ; पोलीसांनी गाडीत उठवून बसवलं
कळंबोली पोलीस ठाण्यातून केतकी चितळेला घेऊन जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच जोरदार राडा घातला. केतकी हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर केतकीच्या अंगावर काळी शाईही फेकण्यात आलीय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याबाबत अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) अखेर अटक करण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यातून तिला घेऊन जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेरच जोरदार राडा घातला. केतकी हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर केतकीच्या अंगावर काळी शाईही फेकण्यात आलीय. यावेळी कळंबोली पोलीस (Kalamboli Police) ठाण्याबाहेर काही क्षण मोठा गोंधल पाहायला मिळाला. केतकीवर शाईफेक होताच पोलिसांनी तिला तातडीने गाडीत बसवलं, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर नेमकं काय घडलं?
केतकी चितळेला कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर आणण्यात आलं. त्यावेळी तिच्यासोबत काही महिला पोलीस आणि पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा गराडा होता. पोलीस ठाण्यातून बाहेर येताना केतकीच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. ती शांत दिसत होती. तिला जेव्हा पोलीस ठाण्यातून बाहेर आणण्यात आलं त्याच वेळी केतकी चितळे हाय हायच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी तिला मारण्याचाही प्रयत्न केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तसंच तिच्यावर शाई फेकण्यात आली. मात्र, महिला पोलिसांनी तिला घेरलं असल्यामुळे तिच्या अंगावर जास्त शाई पडली नाही. उलट महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडावरच ही शाई पडल्याचं पाहायला मिळत आहे.
शाईफेक झाल्यानंतर तिथे गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे केतकी पोलीस गाडीत नीट बसू शकली नाही. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं! तेव्हा चेहऱ्यावर शाई पडलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिची मदत केली आणि तिला गाडीत व्यवस्थित बसवलं. त्यानंतर ती पोलीस गाडी तिथून रवाना झाली.
केतकीला चोप दिल्याचा, अंड्यांचा प्रसाद दिल्याचा दावा
दरम्यान, कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकीवर शाईफेक आणि तिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार यांच्यावर कुणी अशाप्रकारे टीका करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मनाली भुलारे यांनी दिलाय. तसंच केतकीला चोप दिल्याचा आणि तिच्यावर अंडे फेकल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.