‘अर्जुन खोतकरांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली, बाजार समितीतही घोटाळा’, किरीट सोमय्यांचा आरोप
अर्जुन खोतकर प्रकरणात युती, आघाडी वा सत्तेचा प्रश्न येत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही चौकशी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना, भाजप युतीच्या काळात ही चौकशी सुरु झाली होती, असं सोमय्या म्हणाले.
जालना : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेते आणि मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरुच आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली आहे. बाजार समितीतही घोटाळा केला. तसंच अजून दोन भूखंडाचे घोटाळे माझ्यासमोर आले आहेत, असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अर्जुन खोतकर प्रकरणात युती, आघाडी वा सत्तेचा प्रश्न येत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही चौकशी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना, भाजप युतीच्या काळात ही चौकशी सुरु झाली होती, असं सोमय्या म्हणाले. 69 कोटीची जमीन खोतकर यांनी 29 कोटीत घेतली. खोतकर यांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. महाभारतातील अर्जुन हे वेगळ्या अर्थाने लक्षात होते. तर उद्धव ठाकरेंचे सहकारी हे घोटाळ्यासाठी ओळखले जाऊ लागले आहेत, असा टोलाही सोमय्या यांनी लगावलाय.
‘कारखाना खरेदीत अर्जुन खोतकरांनी अजित पवारांची कॉपी केली’
खोतकर यांनी अजित पवार यांची कारखाना खरेदीत कॉपी केली. अजित पवारांनी जरंडेश्वर तर खोतकर यांनी जालना कारखाना खरेदीत भ्रष्टाचार केलाय. उद्धव ठाकरे सरकारवर माझा विश्वास नाही. ईडीवर माझा विश्वास आहे. घोटाळेबाज हा घोटाळेबाज असतो. गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे. जालना बाजार समितीत भाजपचा उपसभापती आहे. ते दोषी असतील तर ठाकरे सरकारनं याची चौकशी करावी, असं आव्हान सोमय्या यांनी दिलंय. राजेश टोपे यांच्यासंदर्भातही आपल्याकडे काही पेपर आहेत. पण अभ्यास पूर्ण होईपर्यंत मी बोलणार नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान खोतकर यांच्यावर नक्की कारवाई होणार, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.
भाजपने मला वाऱ्यावर सोडलेले नाही- सोमय्या
भाजपने मला वाऱ्यावर सोडलेले नाही. माझी घोटाळ्यावरची पुस्तिका प्रकाशित झाली ती प्रदेश भाजपने केली आहे. त्याच्या प्रकाशनालाही सगळे नेते उपस्थित होते. त्यामुळे मी आलो म्हणजे भाजप आली, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.
जालन्यातील भाग्यनगर येथील घरावर छापा
शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी सुरु केली आहे. यावेळी अर्जून खोतकर घरीच होते, अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. यापूर्वी खोतकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत, मालक नाही, असं स्पष्टीकरण खोतकरांनी दिलं होतं.
इतर बातम्या :