Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं, आता पत्रकार परिषदेकडे लक्ष
पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते.
कराड, सातारा : पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोमय्या कोल्हापूरकडे जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Police stopped Me at Karad under Prohibitory order 9am Press Conference at Karad Circuit House I will expose 1 more scam of Hassan Mushrif
पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडल थांबवले 9 वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणारं
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 20, 2021
जिल्हाबंदीचे आदेश
दरम्यान, कोल्हापूरचे अतिरीक्त जिल्हा अधिक्षक तिरुपती काकडेंनी सोमय्यांना जिल्हाबंदीचा आदेश दाखवून कोल्हापूरला न जाण्याची विनंती केली. तिरुपती काकडे हे स्वत: कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस चढले. त्यांनी सोमय्यांची चर्चा केली. मात्र कोल्हापूरच्या पूर्वी दोन स्थानकावर उतरण्याची विनंती पोलिसांनी सोमय्यांना केली. पोलीस सोमय्यांना कराड स्थानकावर उतरवलं.
किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहावर आहेत. सकाळी 10 वाजता सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद आटोपून सोमय्या मुंबईसाठी रवाना होणार आहेत.
हसन मुश्रीफांवरील आरोपानंतर कोल्हापूरकडे रवाना
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला. पण तो आदेश न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय कायम ठेवला.
लोणावळा रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्ते दाखल, सोमय्यांचा सत्कार
महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा तिथे भाजप कार्यकर्तेही तिथे दाखल झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्या यांचं समर्थन केलं. तसेच काहिंनी सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी सोमय्या यांनी आपण कोल्हापुरात जाणारच, असं कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितलं. विशेष म्हणजे लोणावळा रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते देखील जमले होते. त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.
पुणे रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी देखील पुणे रेल्वे स्थानकावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली बघायला मिळाली. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांचं अभिनंदन केलं. तसेच जोरजोरात घोषणाबाजी केली.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका
या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेना नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांन या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. “भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्र्यांवर आरोप करत असतात. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. याशिवाय गणेशोत्सव सुरु आहे. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात आहेत. त्यांच्यावर ताण आहे. सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. त्यांच्या कोल्हापुरात जाण्याने त्यांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. कायद्यामध्ये ज्या तरतूदी आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाऱ्यांनुसार मनाईचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
video : किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या