प्रताप सरनाईकांवर किरीट सोमय्यांचा नवा आरोप! कारवाईची मागणी
ज्यांची फसवणूक होणार आहे त्यांना नुकसान भरपाई कोण देणार? प्रताप सरनाईकांवर कारवाई होणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांवर अजून एक गंभीर आरोप केलाय. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील विहंग गार्डन मधील बी 1 आणि बी 2 इमारतीत राहणाऱ्या लोकांची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केलीय. (Kirit Somaiya’s serious allegations against Pratap Sarnaik)
ठाण्यातील विहंग गार्डन मधील बी 1 आणि बी 2 इमारतींना अद्याप वापर परवाना मिळालेला नाही. तसंच इथे अनेक मजल्यांचं काम अनिधिकृतरित्या करण्यात आलं आहे. 2008 पासून या इमारतीमध्ये राहण्यासाठी आलेल्या मध्यमवर्गीयांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक होणार आहे त्यांना नुकसान भरपाई कोण देणार? प्रताप सरनाईकांवर कारवाई होणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
विहंग गार्डनमधील याच इमारतीमध्ये प्रताप सरनाईक यांचं कार्यालय आहे. त्याचबरोबर सरनाईक यांचे सरकारी अमित चंडोल यांचं घरही 12 आणि 13 व्या मजल्यावर आहे. या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. 2012 मध्ये विहंग गार्डनमधील अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते. पण आता 2020 पर्यंत ठाणे महापालिकेनं कारवाई का केली नाही? असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे. या प्रकरणात संबंध असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि ठाणे महापालिका आयुक्तांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही सोमय्यांनी केलीय.
खेळीमेळीच्या वातावरणात चौकशी झाली- सरनाईक
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘ईडी’कडून करण्यात आलेल्या चौकशीसंदर्भात भाष्य केले. ‘ईडी’कडून माझी सलग पाच तास चौकशी करण्यात आली. मात्र, ही सर्व चौकशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
‘कंगना रानौतमुळे माझी बदनामी, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे’
माझ्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे ट्विट कंगना रानौत हिने केले होते. त्यामुळे देशभरात माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली. माझ्या कुटुंबीयांना या सगळ्याचा नाहक त्रास झाला. याबाबत मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून त्याला तात्काळ मंजुरी मिळावी, अशी विनंती मी सभागृहाला केली आहे. खोटे ट्विट करणाऱ्या कंगनाला शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणीही महाराष्ट्राची बदनामी करणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
‘ईडी’च्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी झाली: प्रताप सरनाईक
पूर्वेश सरनाईकांची ईडी चौकशीला दांडी, गैरहजेरीचं कारण…
Kirit Somaiya’s serious allegations against Pratap Sarnaik