किरीट सोमय्या पुन्हा दापोलीत, उद्या नाट्यमय घडामोडी?
किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ज्या ज्या वेळी दापोलीचा दौरा केलाय, त्यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या सोमय्यांच्या दौऱ्यात काय होणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) उद्या म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा दापोली दौऱ्यावर जाणार आहेत. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील काय कारवाई केली आहे, यासंबंधीची विचारणा करण्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल होणार आहेत. शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट असून त्याच्या बांधकामात अनियमितता असल्याचा आरोप परबांवर आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे हे रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाडापाडीची निविदाही काही दिवसांपूर्वी काढण्यात आली होती.
दिल्लीतील ट्विन टॉवरप्रमाणे परब यांचं साई रिसॉर्टदेखील पाडण्यात यावं, अशी मागणी सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. हीच कारवाई कुठपर्यंत आली आहे, याचा आढावा घेण्यासाठी सोमय्या दापोलीत जाणार आहेत.
किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ज्या ज्या वेळी दापोलीचा दौरा केलाय, त्यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या सोमय्यांच्या दौऱ्यात काय होणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. तसेच राजकीय वर्तुळाच्याही नजरा सोमय्या पुन्हा काय बोलणार, याकडे वेधले आहे.
साई रिसॉर्ट प्रकरण आतापर्यंत-
- दापोलीतील मुरूड येथील साई रिसॉर्ट हे शिवसेना नेते अनिल परब यांचे असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
- परब यांनी लॉकडाऊनच्या काळात शेतजमिनीवर रिसॉर्ट बांधून फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
- मंत्रिपदाचा दुरुपयोग करत तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं.
- दापोली-मुरूड समुद्र किनाऱ्यावर ही जागा आहे. 1 कोटींमध्ये ही जागा पुण्यातील विवान साठे यांच्याकडून घेतल्याचं सोमय्यांनी आरोपात म्हटलंय.
- खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. पण सातच दिवसात अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला एक पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला जोडला, असा आरोप सोमय्यांनी केलाय.
- जागा अकृषीक दाखवल्यानंतर 10 महिन्यातच जागेवर रिसॉर्ट उभं राहिलं. यासाठी 2017 ते 2021 या काळातील टॅक्स तलाठ्याकडे परब यांनी भरला, असा आरोप सोमय्यांनी केलाय.
- केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने या प्रकरणी चौकशी केल्यानंतर हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे, असा उल्लेख केलेला नाही.
- मुरुड येथील हे रिसॉर्ट पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडापाडीकरिता निविदा मागवल्या आहेत.
- ही प्रक्रिया कुठवर आली, याचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या गुरुवारी दापोलीत दाखल होत आहेत.