शिंदे सरकारकडून गरीबांची थट्टा? आनंदाचा शिधा वाटप, किशोरी पेडणेकरांचे आरोप काय?
आनंदाचा शिधा इथे पोहोचलाच तर लोकं एवढी ते घेण्यासाठी रांगा लावतील, त्यामुळे पुढची दिवाळी येईपर्यंत लोकांना हे मिळणार नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.
विनायक डावरुंग, मुंबईः रेशनकार्ड (Rationcard) धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी शिंदे सरकाकरने आंनदाचा शिधा या योजनेची घोषणा केली. मात्र दिवाळी तोंडावर आली तरी हा आनंदाचा शिधा गरीबांपर्यंत पोहोचला नाहीये, असा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलाय. गरीबांना दिवाळीत दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 100 रुपयात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर पाम तेल यांचं किट रेशन दुकानात देण्याचा निर्णय घेतला. या वस्तूंना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) म्हटलं जातंय. मात्र त्याच्या वाटपात अडथळे येत असल्याचं चित्र आहे.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत यासंदर्भात पाहणी केली असता अनेक ठिकाणी शिधा पोहोचलाच नाही. अनेक दुकानात लोक रांगा लावत आहेत. मात्र शिधा उपलब्ध नसल्याने दुकानदारांना दुषणं देत ते बाहेर पडतायत, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
कालपासून काही लोकं टेम्पो लावून कशाचंही वाटप करत आहेत… खाऊचे पुडे वगैरे वाटत आहेत.. असे आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेत.
रेशन दुकानदारांनी यासाठीचे पैसेही भरले आहेत. पण आनंदाचा शिधा इथे पोहोचलाच तर लोकं एवढी ते घेण्यासाठी रांगा लावतील, त्यामुळे पुढची दिवाळी येईपर्यंत लोकांना हे मिळणार नाही, असं पेडणेकर म्हणाल्या. दहीहंडी महोत्सवात एवढ्या घोषणा सरकारने केल्या. पण जे गोविंदा जायबंदी झाले, त्यांच्या घरी जाऊन दिवाळी पाहिली का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केलाय.