सत्ताधारी गटातील संचालक विरोधकांच्या गळाला, गोकुळ दूध संघ निवडणुकीत चुरस
कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक 2 मे रोजी होणार आहे. (Kolhapur Gokul Milk Sangh Election)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. या दूध संघासाठी 2 मे रोजी मतदान, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण देखील तापायला सुरुवात झाली आहे. एका बाजूला हे सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मोट बांधली आहे. तर सत्ताधारी गटातील काही संचालक विरोधकांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच गोकुळ दूध संघाची निवडणूक चुरशीची झाली आहे. (Kolhapur Gokul Milk Sangh Election everything to know)
राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक 2 मे रोजी होणार आहे. मतदान महिन्याभरानंतर होणार असलं तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण गेल्या दोन महिन्यापूर्वीपासूनच तापायला सुरुवात झाली आहे. गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली आहे.
गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?
दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक
रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन
मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी
गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल
गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात
आमदारकी नको पण गोकुळचा संचालक बनवा, असा कोल्हापूर जिल्ह्यात वाक्यप्रयोग आहे. यावरुनच गोकुळच्या वैभवाचा अंदाज येऊ शकतो. एकीकडे आर्थिक सत्ताकेंद्र मिळवण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली असताना त्यांना सत्ताधारी महाडिक गटाच्या नाराज संचालकांचीही साथ मिळाली आहे. दूध संघात काय बोलतो, यापेक्षा कोण बोलतो याला महत्त्व दिलं जातं. बहुतांशी संचालक दोन नेत्यांच्या निर्णय पुढे जात नसल्याची नाराजी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली आहे.
सत्ताधारी महाडिक गटाला घामटं
मल्टीस्टेट, संघातील अपहार, संचालकांचा अतिरिक्त खर्च अशा अनेक मुद्द्यांवरुन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्ताधारी महाडिक गटाला घाम फोडला आहे. त्यांचा प्रत्यय गेल्या तीन वर्षापासून होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील येतो. विरोधकांचा आक्रमकपणा, विद्यमान संचालकांमधील फूट अशा अनेक गोष्टी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.
संबंधित बातम्या :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान
(Kolhapur Gokul Milk Sangh Election everything to know)