कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? Rajesh Kshirsagar यांची नाराजी कायम; तर Jayashree Jadhav यांना अश्रू अनावर
जयश्री जाधव यांना कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राजेश क्षीरसागर यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.
कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Late Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. पोटनिवडणुकीसाठी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना काँग्रेसकडून संधी देण्यात आलीय. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, जाधव यांच्याविरोधात भाजप उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट झालंय. तसंच आम आदमी पक्षानेही आता कोल्हापूरच्या रिंगण्यात उतरणास असल्याचं जाहीर केलंय. अशावेळी महाविकास आघाडीची डोकेदुखी अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे!
जयश्री जाधव यांना कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राजेश क्षीरसागर यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. मात्र, राजेश क्षीरसागर हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर उत्तरमध्ये क्षीरसागर यांची मोठी ताकद आहे. अशावेळी त्यांची नाराजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा
LIVE: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक, ‘महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळावा’ https://t.co/m4McGnHlqT
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 20, 2022
जयश्री जाधव यांना अश्रू अनावर
दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्यात काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना अश्रू अनावर झाले. मेळाव्यात दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्यावरील गीत सादर करण्यात आलं. त्यावेळी जयश्री जाधव यांच्या मनात चंद्रकांत जाधव यांच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
सतेज पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन
स्वर्गीय चंद्रकांत जाधव आण्णा यांचे कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, हा विश्वास आहे.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) March 20, 2022
कशी असेल पोटनिवडणुकीची प्रक्रिया?
17 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
24 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
25 मार्च – उमेदवारी अर्जांची छानणी
28 मार्च – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
12 एप्रिल – मतदान
16 एप्रिल – मतमोजणी
भाजपकडून सत्यजित कदमांना संधी मिळणार?
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजप ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, दोनच नावं पाठवायची असतात. दिल्ली त्यावर विचारते तुम्हाला कोणतं नाव हवंय. पण निर्णय दिल्लीचे नेतेच करतात. त्यामुळे निर्णय झाला नाही. निर्णय रात्री होणाऱ्या पार्लमेंट्री बोर्डात होईल. सत्यजित कदम आणि महेश जाधव यांचं नाव पाठवलं आहे. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं आहे. त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
इतर बातम्या :