विरोधकच नाही, सत्ताधारीही विधानभवनाच्या पायरीवर, जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ; नेमकं काय घडलं?
विरोधकांकडूनही हातात संविधनाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आले. यामुळे विधानभवनात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी हे आमनेसामने आल्याचे दिसत आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील सभागृहात जीभ घसरली. अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गदारोळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर भर सभागृहात शिवीगाळ केली. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर प्रसाद लाड यांनी सत्ताधारी आमदारांसह ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रसाद लाड यांनी अंबादास दानवेंनी माफी मागवी, अशी मागणी केली. तसेच राहुल गांधींनी माफी मागावी, अशाही घोषणा भाजप आमदारांकडून करण्यात आल्या. राहुल गांधी हाय हाय अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या. यावेळी अंबादास दानवेंनी वापरलेल्या अर्वाच्य भाषेवरुन एकच गदारोळ पाहायला मिळाला.
अंबादास दानवेंना निलंबित करा, गिरीश महाजनांची मागणी
हे अतिशय गंभीर आहे, सर्व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. देवांचा अपमान केला. त्यामुळे राहुल गांधी जे बोललेत ते गंभीर आहेत. त्यांनी माफी मागायला हवी. तसेच त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी. अंबादास दानवेंनी त्यापेक्षाही वाईट भाषा वापरली. त्यांनी ज्या प्रकारे शिवीगाळ केलेली आहे, ते अतिशय गंभीर आहे. त्यांना निलंबित केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
तर दुसरीकडे विरोधकांकडूनही हातात संविधनाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आले. यामुळे विधानभवनात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी हे आमनेसामने आल्याचे दिसत आहे.
नियम आणि कायदे मला शिकवण्याची गरज नाही – अंबादास दानवे
“राजीनामाच्या मागणी करणं हे त्यांचं काम असतं. त्याने काही फरक पडत नाही. त्यांना जे काही करायचे ते करु द्या. भाजपने नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भाजपने राहुल गांधींना संसदेतून निलंबित केलं होतं, १५० खासदारांना निलंबित केले होते. त्यांनी संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे मला किंवा उद्धव ठाकरेंना शिकवण्याची गरज नाही. त्यांनी सभापतींकडे जाऊन माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, कोर्टात जावं. त्यांना कायदे आणि नियमांची आता जाणीव झाली आहे आणि ते चांगलं आहे. मी शिवसैनिक आहे आणि त्याप्रमाणे मी ते उत्तर दिले. मी त्यांच्यासारखा पळपुटा नाही. मी बोललो आहे आणि ते मला मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
विधान परिषदेचे कामकाज एका तासासाठी स्थगित
विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपने केले आहे. भाजपाचे नेते पुन्हा एकदा विधान परिषदेत आक्रमक झाले. यानंतर विधान परिषदेचे कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आले.