‘मिलिंद नार्वेकर लवकरच मार्ग बदलणार’; कधी उडी घेतील सांगता येत नाही, अधिवेशनात पुन्हा चर्चांना उधाण
मिलिंद नार्वेकर सगळ्याच पक्षांच्या संपर्कात असतात, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.
गिरीश गायकवाड, मुंबई : मातोश्री (Matoshri) आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) सर्वात जवळचे समजले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. नुकत्याच एका घटनेनं या चर्चांना अधिक बळ मिळालंय. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालंय आणि मिलिंद नार्वेकर हे विधीमंडळात उपस्थित झाले. आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर विधिमंडळात हजर झालेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात आमदारांव्यतिरिक्त इतर मंडळी विधानभवनात येऊ शकतात, मात्र मिलिंद नार्वेकर आले तर ते उद्धव ठाकरे गटाकडून आलेत की शिंदे गटाकडून आलेत, यावरून चर्चा सुरु झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी तर स्पष्ट शब्दातच सांगितलंय. मिलिंद नार्लेकर मातोश्रीच्या जवळचे होते… पण आता ते त्यांच्यापासून खूप दुरावले आहेत..
संजय शिरसाट काय म्हणाले?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिलिंद नार्वेकर यांची शिंदे-भाजपशी जवळीकीची चर्चा सुरु झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी अगदीच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आज सभागृहात बसले होते. त्यावरही त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली.देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो.अनेक वर्षापासून आमदार होण्याची त्यांची इच्छा आहे. पण उद्धव साहेबांनी त्यांना बनवलं नाही. उद्धव ठाकरे यांचा चाणक्य म्हणून ते ओळखले जायचे. आज ते साईड ट्रॅक झाल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आले आहेत. अर्थसंकल्पाशी त्यांचं देणंघेणं नाही. तरीही ते आले. राजकीय लोकांशी त्यांचं देणंघेणं आहे. निश्चितच ते त्यांचा मार्ग शोधत असतील.
‘मिलिंद नार्वेकर सगळ्यांचेच’
मिलिंद नार्वेकर सगळ्याच पक्षांच्या संपर्कात असतात, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. ते म्हणाले, ‘ त्यांची सर्वांशी जवळीक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं एकदम खास आहे. दरवर्षी गणपतीला देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी जातात. शिंदे साहेबांशीही त्यांचं खास आहे. शिंदेही दरवर्षी त्यांच्या घरी जातात. सर्व पक्षांशी नातं असलेला एकमेव कार्यकर्ता आहे. मिलिंद नार्वेकर. ते काहीही करू शकतात हा कॉन्फिडन्स सर्वांनाच आहे. त्यामुळे ते कधी काय उडी घेतील सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या ते जवळ आहेत असं वाटत नाही. त्यांनाही वाटतंय आपण आपला मार्ग बदलला पाहिजे…