Shiv Sena: शिवसेनेला पहिलं यश! बहुमत चाचणी विरोधी याचिका सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, सायंकाळी 5ची वेळ ठरली
floor test in Maharashtra : महाराष्ट्रातील राजकीय पेचावर सुप्रीम कोर्टात आधीच एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsigh Koshyari) यांनी बहुमत चाचणीचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी दिलं आहे. उद्या (30 जून) कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी (Floor test in Maharashtra) करण्याच्या अनुशंगाने हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जावं, असे आदेश दिले गेलेत. याला आव्हान शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टात याला आव्हान देण्यात आलं असून याप्रकरणी संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता सुनावणी होण्याआधी तीन वाजेपर्यंत याबाबतची कागदपत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. केंद्रालाही याप्रकरणी बाजू मांडायची आहे, अशी माहितीही महाधिवक्त्यांनी दिली.
बहुमत चाचणीला विरोध
महाराष्ट्रातील राजकीय पेचावर सुप्रीम कोर्टात आधीच एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. विधानसभा उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव आणि बंडखोर आमदारांच्या निलंबनावरील कारवाईचं प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. अशातच राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी अधिवेशनाचे आदेश दिल्यानं महाविकास आघाडी सरकरानं सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव घेतली. यात शिवसेनेला पहिलं यश आलंय. बहुमत चाचणी विरोधीत याचिका सुनावणीला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे. याप्रकरणी आज संध्याकाळी पाच वाजता नेमका सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या राजकीय पेचाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय, की अधिवेशनाचं सत्र बोलावणं, सत्रांत करणं आणि विसर्जीत करणं हे राज्यपालांच्या विशेष अधिकारात येत नाही. त्यामुळे राज्यपालांना जर आता अधिवेशन बोलवायचं असेल, तर त्यांनी ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच बोलवावं लागतं.
दरम्यान आता जे बोलवलेलं विशेष अधिवेशन आहे, ते घटनाबाह्य कृत्य आहे, असं प्रथमदर्शनी वाटतंय, असं उल्हास बापट यांनी नमूद केलं. पण राज्यघटना जी असते ती उत्क्रांत होत जाणारी गोष्ट आहे, असंही त्यांनी नमूद केलं. आता जर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की, राज्यपालांना हा विशेष अधिकार राहिल, तर मात्र यापुढे घटना तशा पद्धतीने शिकवावी लागेल. कारण सुप्रीम कोर्ट हे घटनेचं सर्वोच्च स्थान आहे. सुप्रीम कोर्ट यावर काय म्हणतं, त्यावर अनेक गोष्ट ठरणार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |